Help for farmers- सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना जाहीर केलेली मदत दिवाळी सुरू झाली तरी प्रत्यक्ष शेतकर्यांपर्यंत पोहोचलेली नाही. यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर सरकारने सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई म्हणून मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागांतील शेतकर्यांना ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार इतकी मदत (Help for farmers)निधी देण्याचा शासन निर्णय जारी केला. मात्र तो शुक्रवारी उशिरा काढला. त्यानंतर शनिवारी-रविवारी आलेली शासकीय सुट्टी व सोमवार कामकाजाचा दिवस वगळता पुढील तीन दिवस सुट्ट्या यांचा विचार करता प्रत्यक्ष दिवाळी संपल्यानंतरच शेतक-यांच्या खात्यात ही मदत जमा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान,शेतकर्यांना दिवाळीपूर्वी ही मदत न मिळाल्याने विरोधकांतर्फे काळी दिवाळी साजरी केली जात असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांच्यातर्फे राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलने केली जात आहेत.
शेतकर्यांच्या संख्येचा विचार करता शेतकर्यांना प्रत्येकी सरासरी ९ हजार ६८२ रुपयांची, तर बाधित क्षेत्रफळाचा विचार करता एकरी सरासरी ४ हजार ७२३ रुपये मदत मिळणार आहे. कोकणातील १ लाख ५ हजार २३९ शेतक-यांना त्यांच्या २९ हजार २३३ हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून २८ कोटी १० लाख ६३ हजार रुपये इतकी मदत प्राप्त होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ३५ हजार ६७६, पालघरमधील ४९ हजार ५१७, रायगडमधील १८ हजार ५७८, रत्नागिरीतील १ हजार १५३ व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ३१५ शेतकर्यांना ही मदत प्राप्त होणार आहे. मराठवाड्यातील शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर करण्यात आली आहे. बीड, धाराशिव, परभणी, लातूर व नांदेड या जिल्ह्यांमधील २१ लाख ४९ हजार २२५ शेतकर्यांना १ हजार ३४६ कोटी ८३ लाख १९ हजार तर जालना व हिंगोली या जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ९४७ शेतक-यांना ६५ कोटी ४५ लाख ६७ हजार इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे. लातूर, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यातील ८१ हजार २७४ शेतक-यांना १०६ कोटी ७४ लाख ६५ हजारांची मदत देण्यात आली आहे.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा–
कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहू येथे लाक्षणिक उपोषण
उबाठाचा २५ ऑक्टोबरला मतदार यादीबाबत मेळावा
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाला गती सर्व परवानग्या मंजूर !अडथळे दूर