Pune Traffic Update: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीत होणारी भीषण वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या महामार्गावरील देहूरोड ते सुतारवाडी दरम्यान सुमारे 15.87 किलोमीटर लांबीचा ‘सहा पदरी उन्नत मार्ग’ (Elevated Corridor) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क, वाकड आणि बाणेर परिसरातील हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे.
विधीमंडळात प्रकल्पावर शिक्कामोर्तब
मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विशेषतः नवले पूल आणि परिसरात होणाऱ्या अपघातांवर चर्चा सुरू असताना, आमदार शंकर जगताप यांनी देहूरोड ते सुतारवाडी या प्रस्तावित उन्नत मार्गाबाबत माहिती विचारली. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या भव्य प्रकल्पाचे तपशील सादर केले. हा मार्ग पुढे नवले पुलाला जोडला जाणार असून, यामुळे महामार्गावरील स्थानिक आणि लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी होण्यास मदत होईल.
हिंजवडी आयटी हबसाठी ‘बूस्टर डोस’
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढती गर्दी आणि आयटी कंपन्यांच्या विस्तारामुळे वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरात वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. प्रस्तावित उन्नत मार्ग पूर्ण झाल्यावर खालील परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल:
- पिंपरी-चिंचवड: वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत आणि किवळे.
- पुणे शहर: बालेवाडी, बाणेर, सूस आणि बावधन.
- ग्रामीण भाग: मान, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई.
नाशिक फाटा-खेड मार्गाच्या धर्तीवर विकास
हा नवीन उन्नत मार्ग नाशिक फाटा ते खेड दरम्यान असलेल्या आठ पदरी उड्डाणपुलाच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या प्रकल्पाचे काम पाहणार असून, सध्या भूसंपादन आणि सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. सर्व्हिस रोडचे डांबरीकरण आणि रुंदीकरण झाल्यामुळे स्थानिक वाहतूक सुरळीत होईल आणि मुख्य महामार्गावर होणारी कोंडी कमी होईल.
वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा 15.87 किलोमीटरचा पट्टा भविष्यात गेमचेंजर ठरणार आहे. सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने राबवून हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.










