अदानीसाठी देवनारचा कचरा हटविणार; २५४० कोटींचा खर्च; नवयुग इंजिनिअरिंग कंपनीला मिळाले कंत्राट

Deonar waste will be removed for Adani

मुंबई – देवनार डम्पिंग ग्राऊंड (Deonar Dumping Ground) हे ३११ एकरवर पसरलेले भारतातील सर्वांत जुने आणि सर्वांत मोठे कचरा डम्पिंग ग्राऊंड आहे.या डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर आहेत . आता या ग्राऊंड मधील ११२ एकर जागा ही धारावी पुनर्वसन (Dharavi Rehabilitation) साठी अदानी समुहाच्या (adani group) कंपनीला दिल्याने पालिका स्वतः खर्च करून तेथील कचरा हटवणार आहे. कचरा हटविण्याचे कंत्राट हैदराबाद (Hyderabad) येथील नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड’ या कंपनीला मिळाले असून पालिका त्यासाठी २५४० कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) देवनार डम्पिंग ग्राऊंड साफ करण्याच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या.त्या निविदेत तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. त्यापैकी ‘नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड’ या कंपनीने सर्वांत कमी दर लावल्याने या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.या कंपनीला पालिकेने अंदाज खर्चापेक्षा ७.२९ टक्के जादा दराने हा प्रकल्प दिला आहे.हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २५४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत. पालिकेने या कचरा हटाव प्रकल्पासाठी मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी प्रत्यक्षात तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने बाजी मारली.देवनार डम्पिंग ग्राऊंड १९२७ पासून शिवाजी नगर परिसरात कार्यरत आहे. १२० हेक्टरवर हे डम्पिंग ग्राऊंड आहे.याठिकाणी १२०० मेट्रिक टन कचरा आणला जातो.