Home / महाराष्ट्र / Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष असूनही राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप! सीसीटीव्ही गायब

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष असूनही राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप! सीसीटीव्ही गायब

Rahul Narvekar – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाब्यातील आपल्या तीन नातेवाईकांच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक...

By: Team Navakal
rahul narvekar
Social + WhatsApp CTA

Rahul Narvekar – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाब्यातील आपल्या तीन नातेवाईकांच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांना धमकावल्याचा आरोप  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर केला आहे. धक्कादायक म्हणजे या ठिकाणचे दुपारी 4 नंतरचे सीसीटीव्ही चित्रणही गायब आहे. राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही चौकशी किती प्रामाणिकपणे होईल याबद्दल शंकाच आहे. हा आरोप होत असतानाच नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात अर्ज दाखल करणारे भाजपाचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने नार्वेकर यांच्यावरील संशय अधिक बळावला आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर होती. या दिवशी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विधानसभा अध्यक्ष असूनही राहुल नार्वेकर तिथे स्वतः हजर होते. त्यांच्या उपस्थितीमुळे वादाला तोंड फुटले. इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला. नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे दबावाचे वातावरण निर्माण झाले. काही उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत काहींनी तक्रारी केल्या. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी अधिक गंभीर आरोप करत दावा केला की, इतर उमेदवारांचे अर्ज बाद ठरवून नार्वेकर यांना आपल्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणायचे होते. त्यामुळेच अर्ज भरताना ते  प्रत्यक्ष त्या ठिकाणीउपस्थित होते.


नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात बंडखोरी करणार्‍या कमलाकर दळवी यांनी आज आपला अर्ज मागे घेतल्याने नार्वेकर यांच्यावर विरोधकांचा संशयात भर पडली. हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षावर नाराज होऊन बंडखोरी करणारे दळवी अचानक थंड कसे झाले, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.


नार्वेकरांवरील हे आरोप तपासताना उमेदवारांचे अर्ज भरतानाचे सीसीटीव्ही चित्रण हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. परंतु उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की, 30 डिसेंबर रोजीचे दुपारी चार वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही चित्रण गायब करण्यात आले आहे. ते म्हणाले की, संध्याकाळी चार वाजल्यापासूनचे सीसीटीव्ही चित्रण लोकांसमोर आणा, अशी माझी मागणी आहे. परंतु त्या ठिकाणचे दुपारी 4 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही चित्रण गायब करण्यात आले आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. ती खरी असल्यास त्याठिकाणी तैनात असलेले पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांचीही चौकशी केली पाहिजे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली पाहिजे.


यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओही उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवरून पोस्ट केला आहे. त्यात नार्वेकर मुंबईच्या सहआयुक्तांना फोन लावून हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा आताच्या आता काढा, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे, असे म्हणताना दिसत आहेत.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही नार्वेकर यांच्यावर टीका करताना म्हटले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल 70 अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय भाग घेत आहेत. या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी.


हे आरोप राहुल नार्वेकर यांनी फेटाळले आहेत. आपण कोणालाही धमकावले नाही किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला नाही. विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने राजकीय हेतूने ते आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणी तक्रार आल्यावर राज्य निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना अर्ज दाखल करतानाचे उमेदवारांचे व्हिडिओ चित्रण, त्यावेळी उमेदवारांसोबत कोणकोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर यांनी प्रत्यक्षात उमेदवारांना धमकावले का, तसे असेल तर त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नार्वेकर यांना का रोखले नाही, अशा सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून अहवाल मागवला आहे.


आपनेही आरोप केला की, 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता, उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वीच, आप उमेदवार मागरिट दा कोस्टा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित होत्या. त्यांनी अनामत रक्कम भरली होती, त्याची पावती घेतली होती आणि त्यांना टोकनही देण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात जाऊन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सूचना दिल्या की, इतर कोणत्याही उमेदवाराला दालनात प्रवेश देऊ नये.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांवर
नवाब मलिकांचा आरोप

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. नवाब मलिक म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकारी नियम, कायदे बाजूला सारून निर्णय घेत आहेत. ज्याचे बेकायदेशीर बांधकाम आहे त्याचा अर्ज ते बाद करत नाहीत. तो पात्र असल्याचे ते रात्री साडेदहा वाजता  घोषित करतात. बेकायदेशीर बांधकामाचे पुरावे देऊनही कोणताही आक्षेप घेत नाहीत. प्रभाग 151 मध्ये राजस्थानचा जातीचा दाखला असताना भाजपा उमेदवाराचा अर्ज दाखल करून घेतला जातो. प्रभाग 119 मध्ये शिंदे सेनेचा उमेदवार पालिकेचा व्हेंडर आहे. तो पालिका निवडणूक लढवू शकत नाही. असे असताना त्यावर आक्षेप घेतला जात नाही. ही लोकशाही आहे. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेल्यावर त्यांच्या नोकर्‍या जाणार आहेत, पण त्याआधी निवडणूक आयोगाकडे आम्ही आमचे आक्षेप पत्राद्वारे नोंदवणार आहोत.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा –

नाशिकमध्ये भाजपचे दोन उमेदवार आपसात भिडले; नाशिकच्या विभागीय कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

अजित पवारांची भर सभेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

बांगलादेशी खेळाडू खरेदीवरून शाहरुख खान अडकला टीकेच्या भोवऱ्यात..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या