Devendra Fadnavis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत तामिळनाडूतील भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अण्णामलाई यांनी एका मुलाखतीदरम्यान “बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे विधान केल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
या वादावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून अण्णामलाईंच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे म्हटले आहे.
फडणवीसांचे अण्णामलाईंच्या विधानावर स्पष्टीकरण
अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णामलाई हे तामिळनाडूचे नेते असून तेथील लोकांच्या आग्रहाखातर ते मुंबईत प्रचारासाठी आले होते. त्यांना हिंदी भाषा नीट अवगत नाही, ते नुकतेच हिंदी बोलायला शिकले आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले, “मी जेव्हा तामिळनाडूमध्ये सभेसाठी गेलो होतो, तेव्हा माझ्या तोंडूनही चुकून ‘मद्रास’ असा शब्द निघाला होता. त्यानंतर त्यांनी सांगितल्यावर मी सुधारणा करून ‘चेन्नई’ म्हटले. याचा अर्थ मला त्यांचा अपमान करायचा होता का? तसेच अण्णामलाईंच्या बाबतीत घडले आहे. त्यांना मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे असे म्हणायचे होते, मुंबई महाराष्ट्राची नाही असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ नव्हता.”
राम नाईक यांनीच ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ केले: फडणवीस
विरोधकांवर निशाणा साधताना फडणवीस यांनी इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बॉम्बेचे नाव बदलून ‘मुंबई’ करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मोठी लढाई लढली होती. विधानसभा आणि लोकसभेचे सर्व कायदे त्यांनीच केले होते, विरोधकांनी केवळ पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईच्या अस्मितेवरून भाजपवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊतांचा संताप आणि अटकेची मागणी
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे स्वतःला स्वाभिमानी समजतात, मग त्यांच्याच युतीचा नेता मुंबई महाराष्ट्राची नाही असे म्हणतो, तेव्हा ते गप्प का आहेत? १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या अण्णामलाई यांच्यावर राज्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. भाजपचे स्टार प्रचारकच जर अशी विधाने करत असतील, तर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा भाजपचा डाव स्पष्ट होतोय.”
अण्णामलाई यांनी मुंबईचे बजेट 75,000 कोटी रुपये असल्याचे सांगत येथे ‘ट्रिपल इंजिन’ सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते. मात्र, त्यांच्या एका वाक्याने आता मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









