Devendra Fadnavis : आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) सागरी मार्गावरून भारतीय जहाजे सुरक्षितपणे येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. इराणने या मार्गावर कठोर निर्बंध लादले असतानाही भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना मिळालेला ‘सुरक्षित मार्ग’ (Safe Passage) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी परराष्ट्र धोरणाचा आणि जागतिक प्रभावाचा मोठा विजय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
जागतिक संघर्षात भारताची निर्णायक भूमिका
सध्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हे जागतिक राजकारणातील सर्वात संवेदनशील आणि धोकादायक ठिकाण बनले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षा मुळे हा सागरी मार्ग कधीही बंद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. इराणने या मार्गावर आपले नियंत्रण घट्ट केले असून, केवळ मित्रराष्ट्रांच्या जहाजांनाच परवानगी देण्याची रणनीती आखली आहे. या कठीण प्रसंगात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेमुळे भारतीय तेलवाहू जहाजांचा मार्ग सुकर झाला आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “जे नेते पंतप्रधान मोदींच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करत होते, त्यांना मोदींनी आपल्या कृतीतून चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज अमेरिकेसारख्या महासत्तेतील नेतेही मान्य करत आहेत की, जागतिक संघर्ष थांबवण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे.”
इंधन साठ्याबाबत अफवांचे खंडन आणि विरोधकांवर प्रहार
राज्यातील इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत पसरलेल्या संभ्रमावर मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. आखाती युद्धाचा भारताच्या पुरवठा साखळीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गॅस एजन्सीबाहेर होणाऱ्या गर्दीवर बोलताना त्यांनी काँग्रेसवर ‘पॅनिक’ (भीती) निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला. “राज्यात घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही आणि सरकारने कोणत्याही प्रकारचे रेशनिंग लागू केलेले नाही. मात्र, काँग्रेस जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांना रांगेत उभे राहण्यास प्रवृत्त करत आहे. हे सर्व एक सुनियोजित षडयंत्र आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुराव्यांच्या प्रश्नावर प्रतिसवाल
काँग्रेसच्या षडयंत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेतला. पुरावे काय द्यायचे, असा प्रश्न करत त्यांनी थेट राहुल गांधी, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानांचा दाखला दिला. “जेव्हा पक्षाचे सर्वोच्च नेतेच सातत्याने भीतीदायक विधाने करून जनतेला भडकवत आहेत, तेव्हा त्यापेक्षा मोठे पुरावे काय हवेत?” असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील विरोधकांनी सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून विनाकारण ‘बडबड आणि फडफड’ न करता शांत राहावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
जनतेला विश्वास आणि आवाहन
राज्य शासन परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून असून, इंधन पुरवठा अखंडित राहील याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे आंतरराष्ट्रीय संकटाचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











