Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या अत्यंत कठीण प्रसंगात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहू,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी होणारी निवड आणि त्यांच्या संभाव्य उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, “पक्षीय स्तरावर कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली असून, त्यांच्या कार्यपद्धती आणि उपलब्ध पर्यायांवर प्राथमिक विचारविनिमय झाला आहे. मात्र, अंतिम निर्णय त्यांचा पक्षच घेईल. अजित दादांचे कुटुंब असो वा त्यांचा पक्ष, या संकटकाळात आम्ही वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर त्यांच्या निर्णयाला पूर्ण समर्थन देऊ.”
अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून आगामी अर्थसंकल्पाची जय्यत तयारी केली होती. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी भरून काढण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केले. ते म्हणाले की, “अजित दादांनी अर्थसंकल्पा संदर्भात मोठे काम करून ठेवले आहे. आता उद्यापासून मी स्वतः या प्रक्रियेत लक्ष घालून सर्व अपूर्ण कामे मार्गी लावणार आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून पुढील दिशा ठरवू.” सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात यापेक्षा अधिक भाष्य करणे सध्या त्यांनी टाळले.
महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक निर्णय केवळ राज्य सरकारच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरील निर्णयांबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. नागपूरच्या महापौर निवडणुकी संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. “नितीन गडकरी आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याशी चर्चा करून निवडणुकीची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव शहर अध्यक्ष आणि आमदार मिळून अंतिम करतील. तसेच चंद्रपूरच्या राजकीय परिस्थितीबाबतही स्थानिक नेत्यांना योग्य त्या सूचना (पार्टी लाईन) देण्यात आल्या असून, पुढील प्रक्रिया लवकरच पार पडेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकजूट आणि भविष्यातील पाऊले अजित पवारांच्या निधनाने सरकारमधील एक महत्त्वाचा आधारस्तंभ हरपला असला, तरी महायुतीमधील एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे.












