Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis : “शिवराय नसते तर भारताचा भूगोल उरला नसता”; मुख्यमंत्री फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवरून जागवल्या शिवरायांच्या स्मृती

Devendra Fadnavis : “शिवराय नसते तर भारताचा भूगोल उरला नसता”; मुख्यमंत्री फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवरून जागवल्या शिवरायांच्या स्मृती

Devendra Fadnavis : “छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर भारताचा इतिहास आणि भूगोल आज आपण पाहतो तसा उरला नसता,” अशा शब्दांत...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis : “छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर भारताचा इतिहास आणि भूगोल आज आपण पाहतो तसा उरला नसता,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या अलौकिक कार्याला वंदन केले. किल्ले शिवनेरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवरायांच्या दूरदृष्टीचा गौरव करतानाच, राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत मोठी माहिती दिली.

स्वराज्य ही रयतेची आणि धर्माची चळवळ
उपस्थित शिवभक्तांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या काळात अनेक राजे-महाराजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारण्यात धन्यता मानत होते, अशा प्रतिकूल काळात राजमाता जिजाऊंनी शिवरायांना घडवले. त्यांनी शिवबांना केवळ राजा होण्याचे नव्हे, तर देशाला परकीय जोखडातून मुक्त करण्याचे आणि ‘रयतेचे राज्य’ स्थापण्याचे संस्कार दिले. अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी जी फौज उभारली, ती केवळ राजाला गादीवर बसवण्यासाठी नव्हती; तर ती देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी लढणारी एक ऐतिहासिक चळवळ होती.

जलदुर्गांची उभारणी आणि सागरी संरक्षण
शिवरायांच्या लष्करी धोरणाचे कौतुक करताना फडणवीस यांनी त्यांच्या समुद्री ज्ञानाचा आवर्जून उल्लेख केला. भारताचा भावी शत्रू समुद्राच्या मार्गाने येईल, हे ओळखून जलदुर्ग बांधणारे आणि पश्चिम किनारपट्टी संरक्षित करणारे शिवराय हे पहिले राजे होते. त्यांच्या काळात पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर, जोपर्यंत शिवछत्रपतींचे शासन होते, तोपर्यंत कोणत्याही परकीय आक्रमकाची समुद्री मार्गाने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

अजित पवारांची इच्छा पूर्ण; पुणे जिल्ह्यातील किल्ले अतिक्रमणमुक्त
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिवनेरीवरील प्रेमाचा आणि त्यांच्या संकल्पपूर्तीचा विशेष उल्लेख केला. “अजितदादांना शिवनेरी किल्ल्याबद्दल अपार जिव्हाळा होता. राज्यातील सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा आम्ही केली होती. आज मला हे सांगताना अतिशय समाधान वाटत आहे की, अजितदादांच्या इच्छेनुसार आणि आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाले आहेत. एकाही किल्ल्यावर आता बेकायदेशीर बांधकाम उरलेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक वारसा आणि ४०० व्या शिवजयंतीचा संकल्प
महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (UNESCO Heritage) म्हणून नामांकित करण्यात आले असून जगातील २७ देशांनी याला एकमताने मान्यता दिली आहे, ही राज्यासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी एक मोठा संकल्प जाहीर केला. सन २०३० मध्ये होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत ‘भव्य-दिव्य’ स्वरूपात साजरी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या