Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis on Ajit Pawar Shok Prastav : अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात भावूक भाषण

Devendra Fadnavis on Ajit Pawar Shok Prastav : अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात भावूक भाषण

Devendra Fadnavis on Ajit Pawar Shok Prastav : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारी अत्यंत जड अंतःकरणाने आणि शोकाकुल वातावरणात...

By: Team Navakal
Devendra Fadnavis and Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis on Ajit Pawar Shok Prastav : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारी अत्यंत जड अंतःकरणाने आणि शोकाकुल वातावरणात झाला. प्रथेनुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे भावूक झाले होते. “अजितदादांसारखा सच्चा मित्र आणि खंबीर सहप्रवाशाचे जाणे ही केवळ राजकीय हानी नसून, ती आमच्या अंतःकरणाला वेदना देणारी वैयक्तिक मोठी क्षती आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाकवी भासांच्या श्लोकाचा संदर्भ-
आपल्या भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्र्यांनी महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील एका मार्मिक सुभाषिताचा दाखला दिला. ते म्हणाले की, लाकूड जळताना अग्नी केवळ शरीर जाळतो, मात्र मित्रवियोगाचे दुःख हे हृदय आणि अंतरात्म्याला होरपळून टाकणारे असते. अजितदादांच्या निधनाने आज माझ्यावर हीच वेळ आली आहे. काळाच्या ओघात अनेक जखमा भरून निघतात असे म्हटले जाते, परंतु दादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही वेदना कधीही कमी होणारी नाही.

विक्रमी अर्थसंकल्पाची हुकलेली संधी-
अजितदादांच्या कार्यक्षमतेचा गौरव करताना फडणवीस यांनी त्यांच्या प्रशासकीय पकडीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “सभागृहाचे कामकाज सकाळी सुरू झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत चाले, तरीही दादा आपल्या खुर्चीत तितक्याच तत्परतेने बसलेले असायचे. यंदा त्यांनी राज्याचा १२ वा अर्थसंकल्प मांडला असता आणि आगामी काळात बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रमही त्यांनी मोडीत काढला असता. दुर्दैवाने, नियतीच्या चक्रामुळे आज हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, याची मोठी खंत वाटते.”

प्रशासकीय करारीपणा आणि ‘लाडकी बहीण’ योजना-
अजित पवार यांच्या निर्णयक्षमतेवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आवर्जून उल्लेख केला. वित्त विभागाने या योजनेच्या आर्थिक भाराबाबत फेरविचाराचा सल्ला दिला असतानाही, दादांनी खंबीर भूमिका घेत हा विषय मंत्रिमंडळात मार्गी लावला. त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आणि आम्ही सर्वांनी ‘गुलाबी जॅकेट’ परिधान करण्यास सुरुवात केली होती, त्या आठवणी आज मनात दाटून येत आहेत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

‘राजकीय पोकळी’ शब्दाची प्रचिती-
भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की, आपण अनेकदा नेत्यांच्या निधनानंतर ‘पोकळी’ निर्माण झाली असे म्हणतो. परंतु, ज्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि कणखर नेतृत्व निर्माण केले आहे, असा नेता जेव्हा अचानक सोडून जातो, तेव्हा त्या ‘पोकळी’ शब्दाचा नेमका अर्थ काय असतो, याची प्रचिती आज संपूर्ण महाराष्ट्राला येत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या