Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis: “दोघांची ताकद संपल्यावर ते एकत्र आलेत!” ठाकरे बंधूंच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती प्रहार

Devendra Fadnavis: “दोघांची ताकद संपल्यावर ते एकत्र आलेत!” ठाकरे बंधूंच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती प्रहार

Devendra Fadnavis on Thackeray Alliance Reaction : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेली युती सध्या...

By: Team Navakal
Devendra Fadnavis on Thackeray Alliance Reaction
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis on Thackeray Alliance Reaction : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेली युती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “दोन्ही भावांची राजकीय ताकद संपल्यावर ते एकत्र आले आहेत, त्यामुळे त्यांच्या युतीचा भाजपला कोणताही फरक पडणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“युतीचं श्रेय मी घ्यायला तयार”

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधूंच्या या युतीचे 100 टक्के श्रेय मी घ्यायला तयार आहे. “मराठी माणसाला एकत्र आणण्याची बाळासाहेबांची इच्छा होती, पण ती मी पूर्ण केली असेल, तर त्याचे श्रेय मलाच जाते. मात्र, आता या युतीला खूप उशीर झाला आहे. जर हे दोघे 2009 मध्ये एकत्र आले असते, तर निकाल वेगळे लागले असते. आता दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी झाली आहे की, मराठी असो वा अमराठी, जनता त्यांना मतदान करणार नाही.”

मराठी व्होटबँकेवर दावा

मराठी मतांवर केवळ ठाकरेंचाच अधिकार आहे, हा समज फडणवीस यांनी खोडून काढला. ते म्हणाले, “मराठी व्होटबँक आमचीच आहे. जर मराठी माणसाने भाजपला मतदान केले नसते, तर सलग 3 निवडणुकीत आमचे 15 आमदार निवडून आले नसते. मराठी भाषिकांच्या सर्वच भागांत भाजपला मोठे यश मिळत आले आहे. त्यामुळे भाजप हाच क्रमांक 1 चा पक्ष राहिला आहे.” मुंबईतील ‘मराठीपण’ कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विकासाच्या मुद्द्यावरून टोला

“ठाकरे बंधूंना लोकांच्या मूळ प्रश्नांची जाण राहिलेली नाही. विकासावर बोलायला त्यांच्याकडे काहीच नसल्याने ते ‘मुंबई तोडणार’ यांसारखे भावनिक मुद्दे उकरून काढत आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली. दक्षिण मुंबईतून मराठी माणूस बाहेर का गेला? असा सवाल करत त्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे उदाहरण दिले. “मराठी माणसाला आम्ही घरे देतोय, हे लोक फक्त बोलत राहिले,” असे सांगतानाच त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

या निवडणुकीत शिवसेना-भाजपची काही ठिकाणी युती झाली असून, काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे देखील वाचा – Ajit Pawar : “तुमच्या तोंडात साखर पडो!” बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहून अजित पवारांचे सूचक विधान; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Web Title:
संबंधित बातम्या