Dhananjay Munde : गेल्या सव्वा वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आणि भावनिक संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळाला. भायाळा गावातील पारंपारिक ‘नारळी सप्ताहाच्या’ सांगता समारंभाच्या निमित्ताने मुंडे भगिनी पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले धनंजय मुंडे गेल्या दीड वर्षांपासून केवळ आमदार म्हणून कार्यरत आहेत. या प्रदीर्घ शांततेनंतर त्यांनी प्रथमच आपल्या मनातील खंत आणि संघर्षाचा प्रवास जाहीरपणे मांडला.
पंकजा मुंडे यांचे भावनिक आवाहन-
कार्यक्रमाच्या सांगता समारंभात बोलताना पंकजा मुंडे अत्यंत भावूक झाल्या होत्या. आपल्या वडिलांच्या, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला कधीही विसरू देणार नाही, ही शपथ मी त्यांच्या चितेसमोर घेतली होती. मुंडे साहेबांच्या संस्कारांवर माझा अढळ विश्वास आहे. बीडच्या जनतेने मला जे प्रेम दिले, त्याची परतफेड मी माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी होऊ शकणार नाही.” त्यांच्या या विधानाने उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला होता.
धनंजय मुंडेंचा संघर्षाचा पाढा आणि विरोधकांना इशारा-
पंकजा मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. सुरुवातीला धार्मिक व्यासपीठावरून राजकीय भाष्य करण्याचे टाळणाऱ्या मुंडेंनी महंतांच्या आदेशाखातर आपले मौन सोडले. गेल्या दीड वर्षांतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले, “माझा संघर्ष हा आजचा नाही, तर तो माझ्या जन्मापासून सुरू आहे. जन्मानंतर पहिले चार महिने माझे डोळेही उघडले नव्हते आणि यकृताच्या गंभीर व्याधीने मी ग्रासलेलो होतो. मृत्यूच्या दाढेतून मी केवळ ईश्वरी कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने सुखरूप बाहेर पडलो.”
आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतरच्या काळाचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. मुंडे म्हणाले, “अनेकांनी माझ्या संकटाच्या काळात माझ्यावर टीका केली, पण मी सव्वा वर्ष शांत राहिलो. माझ्या गप्प राहण्यात जर एवढी ताकद असेल, तर ज्या दिवशी मी बोलायला लागेल, त्या दिवशी काय होईल याचा विचार विरोधकांनी करावा.”
राजकीय टोलेबाजी आणि पौराणिक दाखले-
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना रथावर बसण्याचा आग्रह केला होता. या आग्रहाचा समाचार घेताना त्यांनी मिश्किल पण टोकदार राजकीय टिप्पणी केली. “कार्यकर्ते माझ्या गाडीसमोर आडवे झाले, त्यांना रथावर बसवायचे होते. पण रथावर घोड्याच्या बसावे लागते, मोराच्या नाही,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. तसेच, “काही लोक कर्णाचे उदाहरण देतात, पण माझे नाव अर्जुनाच्या नावांपैकी एक ‘धनंजय’ आहे, हे विसरू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.













