Dhananjay Munde : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, परळी येथे झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा आहे.
परळीच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलत असताना धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या त्यांच्या एका निकटवर्तीयाची आठवण झाली. या वेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे देखील सभेला उपस्थित होत्या.
धनंजय मुंडेंचे विधान आणि चर्चा
सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “चोवीस तास जगमित्र कार्यालय (त्यांचे संपर्क कार्यालय) सुरू असायचे. आज 9 ते 10 महिने झाले, कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे; पण हे बोलताना आपल्याबरोबर एक व्यक्ती नाही, याची जाणीव होते. माझ्या एका कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव जाणवते. काय चुकले, काय नाही ते न्यायालय पाहिल.”
मुंडे यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी, त्यांचे हे वक्तव्य संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी आणि त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, वाल्मिक कराड जगमित्र कार्यालयाच्या माध्यमातून सर्व कामे पाहत होते. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या वादातून 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती, ज्यात कराड आणि त्याचे साथीदार आरोपी आहेत.
मनोज जरांगेंची टीका
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुंडेंवर थेट टीका केली. ते म्हणाले, “एवढे दिवस मुंडे सांगत होते की, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पण आता त्यांच्या विधानातून त्यांना सगळं माहीत होतं हे स्पष्ट होतं आहे. आरोपी कराड खंडणी गोळा करण्यासारखी चुकीची कामे करत असतानाही त्याची उणीव भासणे, हे लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. एका निष्पाप माणसाला का मारले यावर चर्चा न करता, आरोपीबद्दल अधिक काळजी व्यक्त केली जात आहे.”
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडेंच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला. “संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करूनही जर तो (धनंजय मुंडे) म्हणत असेल की, मला ‘त्याची’ उणीव भासते, तर त्याच्याइतका नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा असू शकत नाही. जो गोरगरीब लेकरांचे मुडदे पाडत असेल, अशा माणसाला फडणवीस आणि अजित पवारांनी किती दिवस पाठीशी घालायचं? आता तरी अजित पवारांचे डोळे उघडावेत,” असे जरांगे म्हणाले.
हे देखील वाचा – Congress : बिहारमधील पराभव जिव्हारी लागला! काँग्रेसने 7 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी









