Dhananjay Munde : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मुंबईतील ‘सातपुडा’ या शासकीय निवासस्थानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रिपद जाऊन पाच महिने झाले असतानाही मुंडे यांनी हे निवासस्थान सोडले नसल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. याबाबत आता धनंजय मुंडे यांनी मौन सोडून स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईतील घराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान सोडणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
एकीकडे विरोधक मुंडे यांच्यावर टीका करत असताना, दुसरीकडे त्यांनी स्वतःच विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केला होता. त्यामुळे ‘मुंबईत घर असूनही शासकीय निवासस्थान का सोडत नाही?’ असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
विरोधकांकडून टीका झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, “मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यासाठी योग्य नसून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे.
माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणं सध्या कठीण आहे, माझा शोधही सुरु आहे. माझ्या सदनिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती केली आहे.”, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सातपुडा बंगल्यावर 42 लाख रुपयांचा दंड?
दरम्यान, याआधी, शासकीय बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर 42 लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याची चर्चा होती. हा दंड मुंडे भरतील का आणि बंगला कधी सोडतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, माझ्या सदनिकेचे काम पूर्ण झाल्यावर मी शासकीय निवासस्थान सोडणार आहे आणि त्याबद्दल शासनाकडे विनंतीही केली आहे, असे त्यांनी सांगितले.