Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका विवाह समारंभाचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले आहे. केवळ लग्नपत्रिकेत नाव न टाकल्याच्या किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादातून दोन गटांत धारदार शस्त्रांनी तुफान हाणामारी झाली. या रक्तरंजित संघर्षात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून गोसावी समाजातील अंतर्गत वादाचे हे हिंसक स्वरूप पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या भीषण हल्ल्यात सोनू गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले साई गोसावी यांचा धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गेला. पोलीस तपासात या हत्याकांडामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी सोनगड (गुजरात) येथील गोसावी समाजातील व्यक्तींची नावे लग्नपत्रिकेत का समाविष्ट केली नाहीत, यावरून दोन्ही गटांत वाद झाला होता. तसेच, समाजातील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्व कोणाचे असावे, या जुन्या वैमनस्याची ठिणगी या विवाह सोहळ्यात पडली. साखरपुड्याच्या मंडपातच हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी धारदार शस्त्रांनी निशस्त्र तरुणांवर हल्ला चढवला.
गुन्हा केल्यानंतर आरोपी आपल्या ‘ब्रेझा’ कारने गुजरातच्या दिशेने पलायन करत होते. मात्र, पिंपळनेर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे हालचाली करत गुजरात सीमेवरील ओटाबरी घाटात सापळा रचला. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक कोंडी (ट्रॅफिक जाम) करून आरोपींची गाडी अडवली आणि कांतीलाल गोसावी (वय ४२), जसवंत गोसावी (वय ३६) व त्यांच्या चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे गुजरातमधून अनिल हट्टू गोसावी या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अनिल गोसावी याने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून चिथावणीखोर इशारा दिला असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपळनेर पोलीस करत असून, अशा क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.














