KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना डोंबिवलीत पैशांच्या वाटपाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आणल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदारांना पैशांची पाकिटे दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
विशेष म्हणजे, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्येच येथे ‘मैत्रीपूर्ण’ लढत रंगली असताना हा प्रकार समोर आला आहे.
पांढऱ्या पाकिटात ३००० रुपये!
डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन येथे हा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करत काही कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन पांढऱ्या पाकिटात ५०० रुपयांच्या ६ नोटा, म्हणजेच एकूण ३,००० रुपये दिल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेचे स्थानिक उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या हालचालींवर लक्ष ठेवले होते. एका महिलेच्या घरी ही पाकिटे पोहोचवली जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना रंगेहाथ पकडले आणि त्याचे चित्रीकरण केले. हे कार्यकर्ते भाजप उमेदवार विशू पेडणेकर यांचे समर्थक असल्याचा दावा केला जात आहे.
महायुतीतच ‘जुंपली’
कल्याण-डोंबिवलीत अनेक जागांवर भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढत आहेत. या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीच या पैसे वाटपाचा व्हिडिओ बनवून भाजपचा डाव उधळून लावल्यामुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी संबंधित पाकिटे जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणावर आता भाजपकडून काय अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिनविरोध जागांच्या विक्रमानंतर अशा प्रकारे पैसे वाटपाचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.









