राज्यात हुंडाछळाचे सत्र सुरूच, आणखी चार महिलांच्या आत्महत्या

Dowry Harassment

नाशिक-  पिंपरी चिंचवड वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच सासरच्या छळाला कंटाळून पुणे,  नाशिक, परभणी आणि अमरावती अशा आणखी चार महिलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संबंधितांवर आरोपींवर गुन्हा दाखल केला असून काही त्यातील काही जणांना अटक केली आहे.

नाशिकमधील गंगापूर परिसरात राहाणार्या भक्ती अथर्व गुजराथी (३७)ने  सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भक्तीचा पती अथर्व गुजराथी आणि सासरा योगेश गुजराथी हे आत्महत्येनंतर फरार झाले होते. मात्र, नाशिक पोलिसांनी दोघांनाही गुजरातमधील नवसारी येथून अटक केली. भक्तीचा अथर्व याच्याशी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पिंपरी तालुक्यातील म्हाळुंगे येथील   पूजा निर्वळ (२२)  हिने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.  या प्रकरणात पूजाचा पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपी अद्याप फरार आहेत. पूजाचा विवाह ३ डिसेंबर २०२४ रोजी गजानन निर्वळ याच्याशी झाला होता. लग्नात थेट हुंडा न घेता, फ्रिज, कपाट व इतर घरगुती वस्तूंची मागणी करण्यात आली होती.

विवाहानंतर पूजा, तिचे पती, सासू-सासरे, नणंद आणि तिच्या दोन मुलांसह पुण्यातील स्पाइन सिटी येथे राहायला आली. सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले. त्यानंतर पतीकडून दुचाकीसाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आधीच लग्नासाठी उसने पैसे घेतलेल्या पूजाच्या वडिलांनी ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर पूजावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी पूजाची शेवटची भेट तिच्या आई-वडिलांशी झाली होती. त्यावेळी तिने छळाबद्दल सांगितले होते.

कुटुंबीयांनी तिला समजावून पुन्हा सासरी पाठवले. मृत्यूच्या दिवशी सकाळी तिचे आईसोबत शेवटचे बोलणे झाले आणि त्यानंतर तिच्या आत्महत्येची बातमी कळली. पूजाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. तसेच, पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यामुळे पोलीस तपासाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे.

झरी गावातील २१ वर्षीय साक्षीचा विवाह १२  डिसेंबर २०२२ मध्ये  गावातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटेशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच साक्षीला तिच्या सासू सासऱ्यांनी  भिकुदास लाटे यांनी मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला स्वयंपाक नीट न येणे, कोणतेही काम व्यवस्थित न करणे अशा कारणांनी सतत त्रास दिला जात होता. याशिवाय नवरा चंद्रप्रकाशही दारू पिऊन साक्षीला त्रास देत होता, मारहाण करत होता आणि आई-वडिलांशी फोनवर बोलण्यासही देत नव्हता. या त्रासाला कंटाळून लग्नाच्या काही आठवड्यांतच साक्षी माहेरी गेली. साक्षीने पती-पत्नीत समेट करण्यासाठी भरोसा सेलकडे अर्ज दिला होता. मात्र  तिला जास्त  त्रास सहन करावा लागला. नवऱ्याने तिला ‘तू पोलिसांकडे का गेलीस? असा प्रश्न विचारत जाच  दिला. साक्षीच्या वडिलांनी तिला नांदायला घेऊन जाण्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कुटुंबियांची समेट घडवण्यासाठी भेट घेतली होती पण या बैठकीनंतरही सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ केली. अखेर तिने गळफास घेऊन आयुष्य संपवले. साक्षीच्या वडिलांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली. यामध्ये पती चंद्रप्रकाश लाटे, सासरा भिकुदास लाटे, सासू प्रमिला लाटे, मोठा दीर  दैवत लाटे, जाऊ सुजाता लाटे, नणंद दयावंती यांचा समावेश आहे.

अमरावतीत पतीच्या छळाला कंटाळून शुभांगी निलेश तायवाडे(३०) या आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर महिलेने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी शुभांगीच्या आईवडिलांनी  गाडगेनगर पोलीस ठाण्यात तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली आहे.या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच निलेशने शुभांगीवर मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला होता. सासरच्या मंडळींकडूनही हा छळ सुरू होता.

मयत शुभांगीचा पती निलेश तायवाडे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ  मॅनेजर पदावर कार्यरत आहे. शुभांगी आणि निलेश यांना एक तीन वर्षांची तर दुसरी एक वर्षाची अशा दोन मुली आहेत. याप्रकरणी शुभांगीची सासू आणि पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.