Dr. Hema Sane Passes Away: ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि निसर्गाशी एकरूप होऊन जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. हेमा साने (वय 85) यांचे काल (19 सप्टेंबर) निधन झाले. वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया म्हणून त्यांची ओळख होती. त्या अविवाहित होत्या.
शिक्षण आणि अध्यापनाचा प्रवास
डॉ. हेमा साने यांचा जन्म 13 मार्च 1940 रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम. एस्सी. आणि पीएच.डी. संपादन केली होती. तसेच, भारतीयविद्या शास्त्रातही (Indology) त्यांनी एम.ए. आणि एम.फिल. पर्यंत शिक्षण घेतले.
पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांनी अध्यापन कार्य केले आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. वनस्पती शास्त्रातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले होते.
विजेविना जगणारी जीवनशैली
डॉ. हेमा साने यांच्या जीवनशैलीने अनेकांना प्रेरणा दिली. पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील जुन्या वाड्यात त्या राहत होत्या आणि त्यांनी आयुष्यभर विजेचा वापर केला नाही. त्यांच्या घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह किंवा मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे नव्हती.
वाड्यातील विहिरीतून त्या पाणी काढत. तसेच, त्या दूरध्वनीचाही वापर करत नव्हत्या. दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, इतिहास आणि प्राच्यविद्या या विषयांवर 30 हून अधिक पुस्तके लिहिली.
नोकरीतील शेवटची 10 वर्षे त्यांनी ‘लुना’ हे वाहन वापरले, त्यानंतर त्या पायीच प्रवास करत होत्या. अलीकडे त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरू लागल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या घरात चार मांजरे, एक मुंगूस, एक घुबड आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा अनेक पक्ष्यांचाही निवास होता, ज्यांना त्या आपले कुटुंब मानत.
विपुल ग्रंथसंपदा
डॉ. साने यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. ‘आपले हिरवे मित्र’, डॉ. विनया घाटे यांच्यासोबत सहलेखन केलेले ‘पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष’, ‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’, ‘सम्राट अशोकावरील देवानंपिय पियदसी राञो अशोक’ ही त्यांची काही प्रमुख पुस्तके आहेत.
त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘बायोलॉजी’ आणि ‘इंडस्ट्रीयल बॉटनी’ सारख्या विषयांवरही पुस्तके लिहिली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रातील अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलेले होते.
हे देखील वाचा – ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर; नीरज घायवानच्या ‘Homebound’ चित्रपटाची निवड