Dr Sangram Patil: लंडनमध्ये राहणारे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि सोशल मीडियावरून आपले विचार मांडणारे डॉ. संग्राम पाटील यांना शनिवारी (10 जानेवारी) मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. लंडनहून मुंबईत उतरताच पहाटे 2 वाजता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
भाजप नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली ही चौकशी करण्यात आली असून १५ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
भाजपच्या सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक निखिल भामरे यांनी डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डॉ. पाटील यांनी फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, तसेच समाजात द्वेष पसरेल असा मजकूर प्रसिद्ध केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, मुंबई पोलिसांनी डॉ. पाटील यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस (LOC) जारी केली होती, ज्याच्या आधारे त्यांना विमानतळावर रोखण्यात आले.
पोलीस कारवाई आणि चौकशी
डॉ. पाटील आपल्या पत्नीसह भारतात आले असता त्यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन लोअर परळ येथील क्राईम ब्रँच कार्यालयात नेण्यात आले. मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पाटील यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 35 (3) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. या कलमांतर्गत जेव्हा शिक्षेचा कालावधी ७ वर्षांपेक्षा कमी असतो, तेव्हा थेट अटक न करता चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस दिली जाते.
डॉ. संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया
चौकशीनंतर सुटका झाल्यावर डॉ. पाटील म्हणाले, “मी फेसबुकवर सातत्याने व्यक्त होत असतो. काही लोकांसाठी तो मजकूर आक्षेपार्ह ठरला असून त्यावरून तक्रार झाली आहे. पोलिसांनी विचारलेली सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. सध्या मला कुठेही जाण्यास बंदी नाही, मी जळगाव जिल्ह्यातील माझ्या मूळ गावी एरंडोलला जात आहे. १० दिवसांनी मी पुन्हा लंडनला जाणार असून जाण्यापूर्वी नोटिशीला उत्तर देईन.”
अॅड. असीम सरोदे यांचा संताप
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटले की, “एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला, जो लंडनमध्ये राहतो आणि सत्य मांडण्याचे काम करतो, त्याला अशा प्रकारे १५ तास अटकाव करून ठेवणे हा छळ आहे. डॉ. पाटील हे ब्रिटीश नागरिक असल्याने आणि सत्तेचे वास्तव मांडत असल्याने त्यांना हा त्रास दिला गेला आहे.” डॉ. पाटील यांना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, असेही सरोदे यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा – BMC Election : “मुंबई महाराष्ट्राची नाही!” भाजप नेते अण्णामलाईंच्या विधानाने राजकारण पेटले









