Drug factory – क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ व निकटवर्ती यांच्यावर ड्रग निर्मिती प्रकरणात अत्यंत खळबळजनक आरोप होत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस भाऊसाहेब आजबे यांनी आरोप केला आहे की, सावरी गावातील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सख्ख्या भावाच्या रिसॉर्टजवळ असलेल्या ज्या शेडमधून पोलिसांना 115 कोटी रुपयांचे कोकेन सापडले आहे, त्या शेडमधील कामगारांना (Drug factory) एकनाथ शिंदेंच्या भावाच्या ‘तेजयश’ या रिसॉर्टमधून जेवण पुरवले जात होते. याचे व्यवस्थापन पक्षाच्या युवासेनेचा तालुका प्रमुख आणि शिंदे यांच्या दरे गावचा सरपंच रणजित शिंदे करत होता. याचे पुरावे देत या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
काल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हे प्रकरण पहिल्यांदा उघड केले. आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ड्रग प्रकरणाशी कसे संबंध आहेत याची माहिती देत खळबळ उडवली. त्या म्हणाल्या की, काल एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी आरोपांवर आपले स्पष्टीकरण दिले. आता त्यांनी सातबारा बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मागे बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला, तेव्हादेखील असाच प्रकार घडला होता. ती गाडी त्याची नाही, नंतर ती गाडी मित्राची, पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीटवरून पुढच्या सीटवर आला वगैरे घडले. हीच गोष्ट आता इथे घडते आहे. आधी प्रकाश शिंदेंचे रेस्टॉरंट जवळ ड्रग कारखान्याची शेड होती असे सांगितले गेले. मग तो प्रकाश शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा भाऊ नाही असे म्हटले गेले. मग प्रकाश शिंदे हा तोच आहे असे सांगितले. आता तोच प्रकाश शिंदे आहे, पण मी ती जागा दुसर्याला वापरायला दिली असे म्हणू लागले आहेत. तिथे हॉटेलच नाही किंवा मी माझी जागा दुसर्याला दिली, असेही चालू आहे.
त्यानंतर पुरावा म्हणून सुषमा अंधारे म्हणाल्या की, गुगलमध्ये जाऊन तुम्ही ‘तेजयश’ हे त्या हॉटेलचे नाव टाकले तर प्रकाश शिंदे यांचे आहे असे स्पष्ट दिसते. त्यांच्या दोन्ही मुलांची नावेही आहेत. हे उघड असताना प्रकाश शिंदे हे माझे हॉटेल नाही असे म्हणाले होते. ते खोटे का बोलले? या रेस्टॉरंटला 4.8 चे रेटिंग दिले आहे. गुगलवर त्याची दिशा आहे. ही जागा व्यावसायिक नसेल तर त्याचे रेटिंग कसे काय येईल? व्हॉट्सअप नंबरदेखील दिलेला आहे, इथे ऑनलाईन बुकिंगही करता येते. हॉटेलचा मॅपही दाखवण्यात आलेला आहे, तिथे दिलेल्या नंबरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये प्रकाश शिंदे असे नाव येते. याचा अर्थ हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदे चालवतात. कारण इथे त्यांचा नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे नाव आलेले आहे, माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही, मी लॉजिकल बोलते. मी प्रामाणिकपणे बोलत आहे, मी एका एका पुराव्यासाठी मेहनत घेते आहे, मी पुन्हा एकदा सांगते महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या विश्वासाचा विषय आहे. आमच्या महाराष्ट्रातील पोरे तुम्ही देशोधडीला लावणार आहात का? असा ड्रग मधून कमवलेला पैसा तुम्ही निवडणुकीत वापरता. मग 22 हजाराला एक मत तर फार सोपी गोष्ट आहे, 22 काय तर 25 हजाराला देखील तुम्ही मत घेऊ शकता. यात रणजित शिंदे व्यवस्थापन करतो तो रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे यांच्या दरे गावचा सरपंच आहे.
पुढे अंधारे म्हणाल्या की, मला सातार्याचे पोलीस तुषार दोषी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या दोघांनाही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही नेमके काय करत होतात? मुंबईच्या लोकांनी कारवाई केली, तरी तुम्ही ढिम्म होतात. काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे सगळे सुचले असेल तर त्याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल, पाचगणी हे पर्यटन ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचे ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. हे मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात. अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना पालकमंत्र्यांना नसेल तर त्यांना पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागत आहे. वाल्मिक कराड प्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत. शिंदे उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
पोलीस तपासात हलगर्जीपणाचा आरोप करत अंधारे यांनी सावरी येथील घटनाक्रमाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, काल आमची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातारा पोलीस सावरीला पोहोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनीचे पत्रकार पोहोचले. त्यांनी पोलीस अधिकार्याला विचारले असता, आमच्याकडे काही तपास नाही. मी सहज आलो असे उत्तर दिले. सातारा पोलिसांकडे तपास नाही, तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे कसे पोहोचले? पोलिसांनी तिथे काहीतरी सामान उचलले. त्याचा काही गैरवापर होऊ नये, यासाठी ते उचलल्याचे सांगितले. पोलीस व्हॅनचे दार उघडल्यानंतर आत एक चाळीस लिटरचा निळ्या रंगाचा कॅन दिसला. काही पोती दिसली. याबाबत पोलिसांना विचारले असता, ते म्हणाले की, आधी जे तपास करून गेले त्यांनी जाताना हे सामान नेले नाही. हे राहिलेले सामान होते. ते चुकून राहिले असेल. एवढी मोठी कारवाई झाली होती, तर कॅन चुकून कसा राहिला? हा कारवाई करणार्या अधिकार्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. गृहमंत्र्यांनी अशा अधिकार्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. पोलिसांनी आधी सर्व परिसर ’क्लिन’ केला होता, मग आता अचानक तिथे पुन्हा कॅन कसा सापडतो? याचा दुसरा अर्थ असा होतो की, त्या भागात अजूनही फॅक्टरी सुरू आहे किंवा ड्रग माफियांचा वावर तिथे आहे.
सुषमा अंधारेंपाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस भाऊसाहेब आजबे यांनीही आज एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या शेडचीच धक्कादायक माहिती दिली की, सातार्यातील कोयना धरणा जवळील दुर्गम भागात हे रिसॉर्ट आणि शेड आहे. तिथे मुंबई पोलीस पोहचून तब्बल 115 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करतात. या शेडपर्यंत पोहोचण्यासाठी 1,200 मीटरचा सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता आहे. या रिसॉर्टचे मालक एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे आहेत. ज्या जमिनीवर हे रिसॉर्ट उभे आहे त्या जमिनीच्या सातबार्यावर जमिनीची मालकी प्रकाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर आहे. यातून एक प्रश्न उपस्थित होतो की, एकनाथ शिंदेच ड्रग माफिया आहेत का?
दरम्यान, प्रकाश शिंदे यांनी सुषमा अंधारेंचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्याशी आपला काहीही संबंध नाही. राजकीय द्वेषातून माझे नाव या प्रकरणात घेतले जात आहे. तर शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाईही हे सर्व आरोप फेटाळत म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर जे बेछूट आरोप केले आहेत, त्यावर मी कालच प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी तेच आरोप परत केले. केवळ राज्यात निवडणुका सुरू आहेत म्हणून सनसनाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा
प्रयत्न आहे.
हे देखील वाचा –
राज्यातील विविध दंडाधिकारी न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण
मेस्सीच्या भारत दौरच्या व्हिडिओची जोरदार चर्चा; व्हिडिओत राजकारण्यांना वगळले..









