Ajit Pawar | छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अमित शाह यांच्या नियोजित कार्यक्रमात राज्य सरकारकडून फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. मात्र, फडणवीसांनी अचानक शिंदे यांना संधी दिल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. केवळ एकाच उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी मिळाली. त्यामुळे अजित पवारांना डावलण्यात आले का? अशा चर्चा सुरू झाल्या.
या चर्चेवर आता स्वतः अजित पवारांनी माहिती दिली. वेळेच्या कमतरतेमुळे मी रायगडावर भाषण केले नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. आयोजकांनी फडणवीसांचे नाव भाषणासाठी पुकारले, पण त्यांनी शिंदे यांना बोलण्याची संधी दिली. यामुळे ऐनवेळी शिंदे यांचे भाषण झाले, मात्र अजित पवार यांना बोलता आले नाही.
भाषण का करता आले नाही? याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, “वेळेच्या कमतरतेमुळे मी रायगडावर भाषण केले नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चर्चा झाली आणि अनेकजण बोलले. पण वेळ कमी असल्याने मी भाषण केले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले,” असे अजित पवार म्हणाले. मात्र, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








