Dynasticism Municipal Corporation Election 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजतात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून आले आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याचे देखील आपण पाहिले. शिवाय या महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर ठाकरे बंधूनी देखील आपली युती जाहीर केली आहे. त्यामुळे यावेळीची महापालिका निवडणूक हि अटीतटीची असल्याचे म्हटले जाते.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर जागावाटपाचा मुद्दा देखील जोरदार गाजताना दिसला. मात्र यंदाची हि निवडणूक केवळ पक्षांच्या संघर्षाची नसून ती ‘घराणेशाही’चे प्रभुत्व सिद्ध करणारी निवडणूक असल्याचे स्पष्ट संकेत या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर मिळत आहेत. या आधीच्या बऱ्याच निवडणुकांमध्ये आपण पाहिले असेल कि बडे नेते सुद्धा आपल्या मुलांसाठी तसेच आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारीसाठी सेटिंग लावताना दिसतात. आणि आपल्या घरातील उमेदवार निवडून यावा यासाठी पराकाष्ठा करतात. या निवडणुकीतही काही वेगळे चित्र नाही. नेत्यांकडून घरच्यांसाठी तिकीट मिळण्यासाठीच्या अवाच्या सव्वा मागण्यांमुळे जागावाटपाचे घोडे अडले असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.
छत्रपती संभाजीनगरसह कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवड देखील या घराणेशाहीला चुकले नाही. तिथे देखील काही बड्या नेत्यांनी आपल्या मुला-मुलींसाठी, पत्नीसाठी आणि नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली आहे. यामुळे साहजिकच निष्ठावान कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या ‘वजनदार’ मागण्यांना कसा प्रतिसाद देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या भाजप-शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे, त्यामुळे तिथे जवळपास २ हजार इच्छुक उमेदवार मैदानात आहेत. त्यात नेत्यांच्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय असल्याचे बोलले जात आहे. रांगड्या कोल्हापुरातही काही वेगळी परिस्थिती नाही आहे. तिथे देखील राजकीय वारसदार आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसत आहे. औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये देखील घराणेशाहीची खुमखुमी दिसून येत आहे.
कोण कोणत्या भागात घराणेशाहीच्या इच्छुकांची गर्दी याचा थोडक्यात आढावा:
१. छत्रपती संभाजीनगर :
शिवसेना (शिंदे गट) : जवळपास सर्वच पक्षात हिच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. त्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी तिकीटाची मागणी केली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी, तर किशनचंद तणवाणी यांनी मुलगा आणि भावासाठी तिकीटाची मागणी केली आहे. माजी महापौर नंदू घोडेले आणि विकास जैन यांनी स्वतःसह पत्नीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
भाजप: खासदार भागवत कराड यांनी मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्वला दहिफळे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे, तर आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतलसाठी तिकीटाची मागणी केली आहे. आमदार संजय केनेकर यांचा मुलगा हर्षवर्धन आणि गुजरातचे मंत्री सी. आर. पाटील यांची कन्या धर्मिष्ठा चव्हाण हे देखील या शर्यतीत उतरण्यास इच्छुक आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर: अंबादास दानवे यांनी भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे, तर चंद्रकांत खैरे यांनी मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांच्यासाठी तिकीटाची मागणी केली आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल देखील निवडणुकीसाठी इच्छुकांच्या गर्दीत आहे.
२. कोल्हापूर: भाजपा : खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांची भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेना (शिंदे गट) : आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव देखील इच्छुकांच्या यादीत सामील.
३. पिंपरी-चिंचवड: वर्चस्वाची लढाई
अजित पवार गट: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आपल्या मुलासाठी सिद्धार्थ बनसोडेसाठी प्रभाग ९ मधून केली उमेदवारीची मागणी.
शिवसेना (शिंदे गट): खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित आणि पुतणे निलेश बारणे या दोघांना प्रभाग २४ मधून मैदानात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे.
भाजप: आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, आमदार उमा खापरे यांचे पुत्र जयदीप खापरे (प्रभाग १९) आणि आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे (प्रभाग १०) यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.
४. पुणे
भाजपा : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबाकडून दुष्यंत मोहोळ रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसेच मंत्री माधुरी मिसाळ यांच्या कुटुंबाकडून करण मिसाळ,दिवंगत आमदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांची नावे देखील जोरदार चर्चेत आहेत.
५. गोरेगाव
शिवसेना (ठाकरे गट) : आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू देखील उमेदवारी साठी इच्छुक आहे.
६. भांडूप
शिवसेना (ठाकरे गट) : खा. संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
७. लालबाग
शिवसेना (ठाकरे गट) माजी आ. दगडू सपकाळ यांनी त्यांच्या मुलगी रेश्मा सपकाळ यादेखील इच्छुकांच्या यादीत आहेत.
८. दहिसर
शिवसेना (ठाकरे गट) : विनोद घोसाळकर यांची धाकटी सून पूजा घोसाळकर या देखील इच्छुकांच्या यादीत सामील.
९. वडाळा
शिवसेना (ठाकरे गट) : माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी देखील आपला मुलगा पवन जाधव याच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
१०. वाकोला
शिवसेना (ठाकरे गट) : विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश आणि मुलगी रुची यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.
११. वरळी
शिवसेना (ठाकरे गट) : विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांची पत्नी पद्मजा चेंबूरकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
१२. कुलाबा
शिवसेना (ठाकरे गट) : माजी. आ.अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक देखील इच्छुकांच्या यादीत सामील.
सामान्य कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता :
बड्या नेत्यांचे नातेवाईकांच्या तिकीटासाठी सततचा तगादा आणि सरीकडे वर्षानुवर्षे पक्षासाठीची निष्ठा या दोन्ही गोष्टी यावेळी निवडणुकीत पणाला लागणार असल्याचे दिसून येत आहे. जागावाटपाचा तिढा सुटताना पक्षश्रेष्ठी गुणवत्तेला प्राधान्य देतात की नेत्यांच्या दबावापुढे झुकून घराणेशाहीला खतपाणी घालणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
हे देखील वाचा – Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून पहिली देशांतर्गत फ्लाइट; नाताळच्या दिवशीच होणार पहिले उड्डाण









