Earthquake : आज सकाळी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सकाळी ८:४६ वाजताच्या सुमारास जमीन हादरू लागल्याने आणि घरातील भांडी खाली पडल्याने लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. सुदैवाने, या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित किंवा मोठी वित्तहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही.
हिंगोलीतील पांग्रा शिंदे भूकंपाचा केंद्रबिंदू
या नैसर्गिक घटनेचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे हा परिसर असल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गेल्या काही काळापासून भूगर्भातून गूढ आवाज आणि धक्के बसण्याचे सत्र सातत्याने सुरू असल्याने येथील नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते, त्यात आजच्या धक्क्याने भर घातली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पडसाद
भूकंपाचे हे धक्के केवळ हिंगोलीपुरते मर्यादित नसून, मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही जाणवले. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतही जमीन हादरली. यवतमाळमधील पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी परिसरात सकाळी ८:४५ च्या सुमारास जमिनीतून हादरे जाणवले, तर वाशिम शहर आणि परिसरातील नागरिकांनीही भूकंपाचा अनुभव घेतला. अचानक आलेल्या या संकटामुळे लहान मुले आणि महिलांनी मोकळ्या मैदानांच्या दिशेने धाव घेतली.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
भूकंपाच्या धक्क्यांनंतर अफवांचे पीक येण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “हे धक्के सौम्य स्वरूपाचे असून सद्यस्थितीत घाबरण्याचे कारण नाही.











