Mithi River Scams| मिठी घोटाळ्यातील केतन कदमचा ईडी पथक तुरुंगात जबाब नोंदवणार

ED Gets PMLA Court Nod To Record Accused Ketan Kadam’s Statement In Arthur Road Jail


मुंबई – विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला (ED) मिठी घोटाळ्यातील (Mithi River Scams) मुख्य आरोपी केतन कदम याचा जबाब नोंदवण्याची परवानगी दिली आहे. ईडी अधिकाऱ्यांचे पथक २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) जाऊन कदमचा जबाब नोंदवू शकेल. सध्या कदम या तुरुंगात आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police Economic Crimes Branch) केतन कदमला ६५.५४ कोटी रुपयांच्या मिठी घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणात त्याने मध्यस्थ जय जोशी आणि काही महापालिका अधिकाऱ्यांसह, एका ठेकेदाराला व्हर्गो स्पेशालिटिज कंपनीकडून जास्त दराने यंत्रे भाड्याने घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे, ज्यामुळे पालिकेला मोठा तोटा झाला.

आर्थिक गुन्हे विभागाने म्हटले आहे की, कदमने पालिका अधिकाऱ्यांचा केरळ आणि दिल्ली येथे जाण्यासाठी प्रवास खर्च उचलला होता. ज्या ठिकाणी त्यांनी मशीनचे प्रात्यक्षिक पाहून तपासणी केली होती. जोशीने असा दावा केला की, नदीतून गाळ काढण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रे भाड्याने घेण्याच्या व्यवहारात कदमच केंद्रस्थानी होता. त्याने ५ मे २०२० रोजी कदमला सीईओ म्हणून नेमले होते आणि सर्व करार, व्यवहार आणि सामंजस्य करार कदमने हाताळले होते व त्यावर सही केली होती.

कदमने दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की तो संबंधित कंपनीचा संचालक किंवा भागीदारही नाही. तो केवळ अधिकृत प्रतिनिधी होता आणि त्या कंपनीत काम करत होता.