मुंबई – सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी छापे टाकले. महापालिकेतील नगररचना विभागाच्या गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, माजी उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याशी संबंधित वास्तुविशारद (architect) आणि एजंटांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले आहेत.
नालासोपारा येथील अग्रवाल नगरी परिसरात ४१ अनधिकृत इमारती (Illegal Buildings) उभारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर अनधिकृत बांधकामाचा आरोप आहे. याबाबत माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे तक्रार केली होती. त्यात महापालिकेतील अधिकारी आणि उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना जबाबदार धरण्यात आले होते. १४ मे रोजी ईडीने रेड्डी यांच्या हैदराबादमधील निवासस्थानासह वसई-विरारमधील १३ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी ३२ कोटी रुपयांचे बेहिशेबी सोने आणि रोकड जप्त करण्यात आली होती. त्याच तपासाच्या पुढच्या टप्प्यात ईडीने ही नवी कारवाई केली आहे. वाय. एस. रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट व बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणाऱ्या एजंटांवरही ईडीने लक्ष केंद्रीत केले आहे. या छापेमारीमुळे वसई-विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.