Eknath Khadse Robbery: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातील चोरीची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पण खडसेंकडे असलेली ती कथित सीडी आणि पेनड्राईव्ह सापडले नाही.
गेल्या आठवड्यात खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील राहत्या बंगल्यात ही चोरीची घटना घडली. यामध्ये खडसेंच्या खोलीतून रोख ३५ हजार रुपये तसेच सोन्याच्या अंगठ्यांसह सात ते आठ तोळे सोने चोरीला गेले होते. याप्रकरणी खडसेंनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद नामक व्यक्तीकडे चोरीचा मुद्देमाल सोपवला. सय्यदने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सोने व्यापाऱ्याला दिला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष चोरी करणारे आरोपी मात्र अजून फरारच आहेत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या तिन्ही आरोपींची नावे असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांनी आरोपींकडून सोने-चांदीच्या दागिन्यासह ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र यामध्ये कोणतीही कागदपत्रे, सीडी, पेनड्राईव्ह सापडले नाही. खडसेंनी पत्रकारांशी बोलताना या वस्तुंची चोरी झाल्याचा दावा केला होता. पण तक्रारीमधून मात्र तसा उल्लेख वगळला होता.
हे देखील वाचा –
अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले









