‘प्रत्येक गोष्टीला वेळ…’; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Pune Rave Party Case

Pune Rave Party Case: राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या अटकेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पुण्याजवळच्या खराडी परिसरात एका ‘रेव्ह पार्टी’चे (Pune Rave Party Case) आयोजन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या घटनेनंतर आता प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

रोहिणी खडसे यांची पतीसाठी पोस्ट

रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट (Post) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पतीसोबतचा एक फोटो टाकत, ‘लवकरच सत्य बाहेर येईल’ अशा आशयाचे विधान केले आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र!”

रेव्ह पार्टी प्रकरण प्रांजल खेवलकर यांना अटक

पुण्यातील खराडी भागातील एका बिल्डिंगमध्ये कथितरित्या ‘रेव्ह पार्टी’ सुरू असल्याचा आरोप आहे. पोलिसांना या पार्टीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ छापा टाकला. यावेळी प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले. तिथे दारूसह मोठ्या प्रमाणात गांजा आणि हुक्का आढळून आला.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील ‘स्टे बर्ड, अझुर सूट हॉटेल’मधील खोली क्रमांक 102 मध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून कोकेनसदृश पदार्थ, गांजा, 10 मोबाईल, दोन कार, हुक्का पॉट आणि दारू असा एकूण 41 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर खराडी पोलीस ठाण्यात ‘एनडीपीएस’ कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एकनाथ खडसेंची संयमी भूमिका

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “पुण्यातील पार्टी ही ‘रेव्ह पार्टी’ होती की घरगुती स्वरूपाची, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल. पार्टीदरम्यान खरोखर अंमली पदार्थांचा वापर झाला होता की नाही, याची खात्री फॉरेन्सिक लॅब अहवालानंतरच होईल. त्यामुळे तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”

“कोण दोषी असेल तर शासन झालंच पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही.’, असे ते म्हणाले.