Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दोन दिवसांसाठी त्यांच्या सातार्यातील दरे गावी गेल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आले आहे. उबाठाचे 8 खासदार महिनाभरात फोडून उबाठात भूकंप घडविण्याची तयारी झाली आहे. महिनाभरात हा बॉम्ब फुटणार आहे. मोठी राजकीय घडामोड होणार असते तेव्हा एकनाथ शिंदे दरे गावी जातात, तिथून दिल्लीला जातात आणि मग मुंबईला परततात. यावेळी ते गावी गेल्याने ऑपरेशन टायगरची यादी तयार झाल्याचे म्हटले जाते.
बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची उबाठाच्या आठ खासदारांसह गुप्त बैठक झाली. या बैठकीला उपस्थित खासदारांची नावे फिरू लागली. त्यात खासदार अरविंद सावंत यांचे नाव असल्याने ते भडकले आणि त्यांनी आज जाहीर निवेदन दिले. त्यांच्या या निवेदनामुळे या फुटीची चर्चा थांबविण्याऐवजी उफाळून आली. त्यात शिंदे यांचे खास मर्जीतील नेते शिरसाट यांनी ऑपरेशन टायगर महिनाभरात होईल, उबाठात स्फोट होईल असे म्हटल्याने राजकारण पेटले. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे यांनी फोडाफोडी होणार नाही असे स्पष्ट सांगितले. पण आता संशयाचे वातावरण गडद झाले आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये नाव घेतल्याने संतप्त झालेले उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत माध्यमांसमोर अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पैशाने विकली जाणारी औलाद नाही, असे ठणकावत मी शिंदेंच्या संपर्कात असल्याचा तुमच्याकडे काही पुरावा असेल तर समोर आणा, असे आव्हान दिले.
अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बरेच काही दिले. उद्धव ठाकरे यांनीदेखील मला मी आज जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली. मी कदापि त्यांची साथ सोडणार नाही. जगेन तर उबाठासाठी आणि मरेन तेही उबाठासाठी, हा माझा शब्द आहे. मी हे तुम्हाला कोर्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. मला उभा चिरलात तरी मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 24 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळेच असल्या बातम्या पेरल्या जात आहेत. मूळ शिवसेनेत आता कोणीही शिल्लक नाही, असे न्यायालयाला भासवण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात आहे.
सावंत यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिंदेसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट, उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. शिंदे गटाचेच संजय शिरसाट यांनी ऑपरेशन टायगरबाबतचे वृत्त खरे आहे, असे सांगत आगीत तेल ओतण्याचे काम केले. ते म्हणाले की, ठाकरेंचे आमदार-खासदार, पदाधिकारी दररोज शिंदेंकडे येतात. शिंदेंसोबत येण्याची इच्छा व्यक्त करतात. ऑपरेशन टायगरची संपूर्ण तयारी झाली आहे. अशा गोष्टी बँडबाजा वाजवत केल्या जात नाहीत. महिन्याभरात उबाठात मोठा राजकीय स्फोट होईल.
त्यावर पलटवार करीत संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे उबाठाचे ऑपरेशन टायगर वगैरे करणार हे सर्व साफ झूठ आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार ऑपरेशन करून शिंदे गटाची डेड बॉडी बनवली आहे. आता त्या डेड बॉडीवर फडणवीस पुन्हा ऑपरेशन करणार आहेत. आमचे नऊच्या नऊ खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहतील.
वडेट्टीवार यांनी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. ते म्हणाले की, राजकारणात आजकाल नैतिकता नावाची चीज शिल्लक राहिलेली नाही. भाजपाने फोडाफोडीचा नवा पायंडा पाडला आहे. कोण कोणासोबत आहे आणि कोण कोणाच्या विरोधात आहे हेच कळत नाही. पक्ष आणि नेते फोडणे ही जणू फॅशनच झाली आहे.
श्रीकांत शिंदेंचा इन्कार
‘ऑपरेशन टायगर’वरून हा सारा गदारोळ सुरू असताना शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मात्र या विषयाची चर्चा बंद व्हावी म्हणून म्हटले की ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही. ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही. या सर्व अफवा आहेत. एकनाथ शिंदे यांनीदेखील माध्यमांसमोर येत ऑपरेशन टायगरचे वृत्त निराधार असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.











