Home / महाराष्ट्र / Eknath Shinde Akola : मध्यरात्री मोठी राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच…

Eknath Shinde Akola : मध्यरात्री मोठी राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच…

Eknath Shinde Akola : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यात परतताच,...

By: Team Navakal
Eknath Shinde Akola
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde Akola : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यात परतताच, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. अकोला महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे सहापैकी चार नगरसेवक आणि जिल्हाप्रमुखांनी मंगळवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. या अनपेक्षित घडामोडीमुळे अकोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, ठाकरे गटाची पाळेमुळे उखडली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी पंतप्रधान मोदींशी दीड तास सखोल चर्चा केली. या भेटीत महाराष्ट्रातील आगामी रणनीती आणि राजकीय समीकरणांवर खलबते झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीहून परतल्यानंतर, मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ठाणे येथील ‘नंदनवन’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यामध्ये अकोला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह नगरसेवक मनोज पाटील, सागर भारुका, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातातील भगवा ध्वज स्वीकारून पक्षात प्रवेश केला.

विशेष म्हणजे, पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये सुरेखा काळे यांचा समावेश असल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत; कारण नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा लाभला होता. आता अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाकडे केवळ दोन नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. जिल्हाप्रमुख आणि बहुतांश नगरसेवकांनी साथ सोडल्यामुळे अकोल्यात शिवसेना (UBT) संघटनात्मक पातळीवर खिळखिळी झाली आहे.

कोणत्या नगरसेवकांनी केला शिंदे सेनेत प्रवेश?
मंगेश काळे (जिल्हा प्रमुख उबाठा)
मनोज पाटील (नगरसेवक उबाठा )
सागर भरुका ( नगरसेवक उबाठा)
सोनाली सरोदे ( नगरसेवक उबाठा)
सुरेखा काळे ( नगरसेवक उबाठा)

जावळीत महायुतीत ठिणगी; शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदेंमध्ये ‘छुप्या युती’चा आरोप-
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. जावळी पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष उफाळून आला असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यावर ‘छुप्या युती’चा गंभीर आरोप केला आहे. या दोन दिग्गज नेत्यांनी एकमेकांशी हातमिळवणी करून जावळीच्या जनतेचा आणि मित्रपक्षाचा विश्वासघात केल्याचे कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.

जावळी पंचायत समितीच्या सभापतीपदी काल भाजपचे उमेदवार सौरभ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपवरच तोफ डागली आहे. अंकुश कदम म्हणाले की, “निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपकडून आम्हाला सातत्याने डावलण्यात आले. महायुतीचा घटक पक्ष असूनही आम्हाला कधीही विश्वासात घेतले गेले नाही. शिवसेनेला अस्तित्वातच नसल्याप्रमाणे गृहीत धरले गेले, म्हणूनच आम्हाला ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी लागली.”

या निवडीमागचे अंतर्गत राजकारण उघड करताना कदम यांनी सांगितले की, शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीचा १ असे एकूण ३ सदस्य एकत्र येऊन ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे सभापती निवडण्याचे प्राथमिक नियोजन झाले होते. या संदर्भात शशिकांत शिंदे यांच्याशी चार-पाच वेळा सविस्तर चर्चाही झाली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी चित्र पालटले. आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात झालेल्या गुप्त खलबतांनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा शिंदे यांना अर्ज भरण्याच्या सूचना देऊनही त्या मतदानावेळी तटस्थ राहिल्या. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे भाजपचा विजय अधिक सुकर झाला.

“राष्ट्रवादीने ऐनवेळी अशी भूमिका का घेतली? आणि भाजपसोबत पडद्यामागून कोणती समीकरणे जुळवली? आम्हाला अंधारात ठेवून हा जो राजकीय डाव खेळला गेला, तो खेदजनक आहे,” असा संतप्त सवाल अंकुश कदम यांनी उपस्थित केला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या