Home / महाराष्ट्र / Eknath Shinde: “खुर्चीसाठी नाही, तर …”; नगरसेवकांच्या हॉटेलमधील मुक्कामावर एकनाथ शिंदेंनी सोडले मौन

Eknath Shinde: “खुर्चीसाठी नाही, तर …”; नगरसेवकांच्या हॉटेलमधील मुक्कामावर एकनाथ शिंदेंनी सोडले मौन

Eknath Shinde : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या...

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महायुतीने झेंडा फडकावला आहे. भाजपने 89 तर शिंदेंच्या शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेल्याने आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये ठेवल्याने राजकीय वर्तुळात ‘हॉटेल पॉलिटिक्स’च्या चर्चांना उधाण आले आहे.

सत्तासंघर्ष की प्रशिक्षण? शिंदेंनी दिले उत्तर

नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून होत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “आमच्या पक्षाची अधिकृत बैठक घेण्यासाठी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पुढच्या 5 वर्षांत पालिकेचे कामकाज कसे चालवायचे आणि लोकांची कामे कशी करायची, याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. आमचा गट तातडीने स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

महापौरपदाचा पेच आणि विरोधकांच्या अफवा

ठाणे आणि कल्याणमध्ये अडीच वर्षांच्या महापौरपदावरून महायुतीत ओढाताण सुरू असल्याच्या बातम्यांवरही शिंदेंनी स्पष्टीकरण दिले. “आमची लढाई ही खुर्चीसाठी नाही, तर मुंबईच्या विकासासाठी आहे. ठाणे आणि कल्याणबाबत सुरू असलेल्या चर्चा केवळ विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. आम्ही २०१९ प्रमाणे जनमताचा अनादर करणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढलो आहोत, त्यामुळे जिथे महायुती लढली, तिथे महायुतीचाच महापौर बसेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवसेनेचा महापौर होणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवावा, अशी भावना शिवसैनिकांमध्ये आहे. यावर विचारले असता शिंदे म्हणाले की, “कार्यकर्त्यांची तशी भावना असू शकते, हे स्वाभाविक आहे. मात्र, या विषयावर अद्याप भाजपसोबत अधिकृत चर्चा झालेली नाही. योग्य वेळी समन्वय समितीमध्ये यावर निर्णय घेतला जाईल.”

मुंबईतील या राजकीय घडामोडींमुळे आता सर्वांचे लक्ष महायुतीच्या पुढील भूमिकेकडे आणि महापौरपदाच्या अधिकृत उमेदवाराकडे लागले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या