Election 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, मुंबईमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच ‘दोस्तीत कुस्ती’ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
एकनाथ शिंदेंच्या भाच्याला राष्ट्रवादीचे तिकीट
आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून आशिष माने निवडणूक लढवणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकानेच निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या माजी महामंत्रीही राष्ट्रवादीच्या गळाला
केवळ शिवसेनाच नाही, तर भाजपलाही या घडामोडीत धक्का बसला आहे. भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक 156 मधून मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देत असल्याने मुंबईत अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत: 30 डिसेंबर 2025
- अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2025
- अर्ज मागे घेण्याची मुदत: 2 जानेवारी 2026
- मतदान: 15 जानेवारी 2026
- मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026
मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र लढत असताना, महायुतीमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. अशातच राष्ट्रवादीने शिंदेंच्या आणि भाजपच्या नेत्यांना पक्षात घेऊन तिकीट दिल्याने आगामी काळात महायुतीत वादाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Navneet Rana on Pawar Family : अजित पवार भाजपसोबत जाणं हा शरद पवारांचाच प्लॅन; नवनीत राणांचा मोठा दावा









