Home / महाराष्ट्र / Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणारच…’; एकनाथ शिंदेंचा मोठा शब्द

Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणारच…’; एकनाथ शिंदेंचा मोठा शब्द

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील 24 नगर परिषदांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अहिल्या नगर येथे आयोजित सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ...

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील 24 नगर परिषदांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अहिल्या नगर येथे आयोजित सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. या सभेत त्यांनी प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भाष्य करताना ‘लाडकी बहीण योजने’बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ही योजना केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये

एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळची योजना आहे. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांकडून अनेक प्रयत्न झाले, परंतु कोणताही माई का लाल ही योजना रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार असून, महिलांना दरमहा मिळणारी रक्कम 2100 रुपये केली जाईल. बहिणींना केवळ आर्थिक मदत देऊन थांबणार नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून लखपती बनवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

रिक्षावाल्याच्या ताकदीचा विरोधकांना इशारा

कोपरगाव नगर परिषदेचे उमेदवार राजेंद्र झावरे यांच्या प्रचारार्थ बोलताना शिंदेंनी स्वतःच्या संघर्षाची आठवण करून दिली. राजेंद्र झावरे यांनी रिक्षाचालक म्हणून काम करत समाजातील सर्व थरांशी संपर्क ठेवला आहे. शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला की, “ज्यांनी रिक्षावाल्याला हलक्यात घेतले, त्यांना आम्ही आस्मान दाखवले आहे.” रिक्षावाला हा सहनशील असतो, तो लोकांच्या सेवेसाठी वाट बघू शकतो; पण जर त्याचा अपमान झाला किंवा त्याला डिवचले, तर तो समोरच्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही, अशी कडक शब्दांत त्यांनी टोलेबाजी केली.

युवक आणि ज्येष्ठांच्या कल्याणाचे सरकार

राज्यातील महायुती सरकारने केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी ठोस पावले उचलल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज 24 नगर परिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. येत्या रविवारी, 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून कोपरगावसह इतर मतदारसंघांमधील जनतेचा कौल स्पष्ट होईल.

हे देखील वाचा – Nilesh Lanke : निलेश लंकेंनी मोदींना दिले रायगड भेटीचे आमंत्रण; गड-किल्ले संवर्धन मोहिमेचे पंतप्रधानांकडून कौतुक

Web Title:
संबंधित बातम्या