Ekvira Devi Karla : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान (Ekvira Devi Karla) ट्रस्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप खुद्द देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यांसह भ्रष्टाचारासारखा गंभीर आरोप ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर केला आहे.
देवीच्या चरणी येणाऱ्या दानावर डल्ला मारला जात असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. पुजारी गणेश देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार, भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंमध्ये मोठी अफरातफर केल्याचे समोर येत आहे. एवढेच नव्हे तर, देवस्थानच्या मालकीची गाडी ट्रस्टच्या कामाऐवजी स्वतःच्या खासगी आणि राजकीय कामांसाठी वापरली जात असल्याचा घणाघाती आरोप देखील स्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे देवीच्या संपत्तीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला जात आहे,” असा थेट आरोप देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला आहे.
या प्रकरणातील सर्वात थरारक बाब म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी भक्तांची होणारी लूट. देवस्थानच्या अधिकृत यंत्रणेला बगल देऊन बनावट पावती पुस्तके छापण्यात आली असून, त्याद्वारे भाविकांकडून रोख रक्कम उकळली जात असल्याचा खळबळजनक आरोप देखील पुजारी गणेश देशमुख यांनी केला आहे.
हा एक मोठा आर्थिक घोटाळा असून यामध्ये मंदिरातील इतरही काही अधिकारी संबंधित असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या सर्व गैरव्यवहारांबाबत पुजारी गणेश देशमुख यांनी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची देखील माहिती आहे.
कोट्यवधी रुपयांच्या या अफरातफरीचा शोध लावण्यासाठी त्यांनी सखोल आणि तपशीलवार चौकशीची मागणी केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कार्ला गडावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, लोकांमध्ये असमाधानी वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय यावर देवस्थानच्या प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहे.
दीपक हुलावळे यांचे स्पष्टीकरण :
प्रसिद्ध कार्ला येथील एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता खुलेआम समोर आला आहे, ज्यामुळे ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये अस्थिरता आणि गोंधळ निर्माण झाला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांवर करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अफरातफरीच्या आरोपांनंतर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, आता या सर्व प्रकरणावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी आपले मौन सोडले आहे. हे सर्व आरोप त्यांनी पूर्णपणे खंडित करून फेटाळून लावले आहेत, व त्यांना कोणताही आधार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आरोपांची सरबत्ती केली होती. “देवस्थानच्या मालकीच्या महागड्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर गाड्यांचा वापर देवीच्या कामासाठी होण्याऐवजी अध्यक्षांकडून वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप देखील पुजाऱ्यांकडून करण्यात आला होत .
गाडीच्या अनुचित वापरासोबतच सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये घडलेल्या अफरातफर तसेच बनावट पावत्यांचा मुद्दा मांडून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आपल्यावर होत असलेल्या आरोपांना दीपक हुलावळे यांनी ठाम भूमिका मंडली. ते म्हणतात “माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस किंवा माहिती अद्यापही मिळालेली नाही. सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने जाणीवपूर्वक ही चिखलफेक होत असल्याचे देखील ते म्हणले. तसेच, योग्य वेळ आल्यावर सर्व पुराव्यांसह आपण माध्यमांसमोर आपली बाजू मांडू,असे स्पष्ट करत त्यांनी सध्या अधिक काही बोलणे टाळले आहे.









