Election – अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपाने एमआयएम आणि काँग्रेससोबत युती केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मीरा-भाईंदर येथेही भाजपाची काँग्रेसशी छुपी युती असल्याचा आरोप आहे. यावरून सत्तेसाठी भाजपाने हिरवी शाल स्वीकारली, अशी कठोर टीका भाजपावर झाली.या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती चालणार नाही, अशी कडक भूमिका घेत ती तोडण्याचे आदेश दिले. काँग्रेसने अंबरनाथ येथे भाजपाशी हातमिळवणी करणार्या नगरसेवकांना निलंबित केले, तर एमआयएमनेही आपल्या नगरसेवकांना युतीतून बाहेर पडायला सांगितले. मात्र, हिंदुत्वाचे राजकारण करताना काँग्रेस आणि उबाठा यांच्यावर मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा सतत आरोप करणारा भाजपा स्थानिक पातळीवर सत्तेसाठी कुठलीही तडजोड करायला तयार असल्याचेच यातून स्पष्ट झाल्याने मतदार चांगलेच संतापले.
अकोट नगरपालिकेतील 35 पैकी 33 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ 11 जागा मिळाल्या. बहुमत नसताना भाजपाच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मात्र यासाठी भाजपाने ‘अकोट विकास मंच’ या नव्या आघाडीची स्थापना केली. या आघाडीत भाजपासोबत एमआयएमसह शिंदे गट, उबाठा, राष्ट्रवादीचे अजित पवार व शरद पवार गट आणि प्रहार जनशक्ती पक्ष अशा सर्वांना सोबत घेतले होते. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात झाली आहे. त्यानुसार भाजपाच्या नगराध्यक्षा माया धुळे यांच्यासह अकोट विकास मंचकडे 33 पैकी 26 नगरसेवक झाले. काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 विरोधी बाकावर बसणार होते. या आघाडीतील सर्व नगरसेवकांना भाजपाचा पक्षादेश (व्हिप) लागू करण्यात आला. भाजपाचे नगरसेवक रवि ठाकूर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. 13 जानेवारी रोजी होणार्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्र मतदान
करणार होती.
एमआयएमशी युती केल्याचे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळताच त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत संतप्त भूमिका मांडली. ते म्हणाले की, स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती चालणार नाही. ही युती तत्त्वशून्य असून, ती अनुशासनहीनतेचे उदाहरण आहे. अशी युती तोडावीच लागेल. ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आवश्यक ते आदेश देण्यात आले आहेत.
तर एमआयएमचे इम्तियाज जलील म्हणाले की, भाजपा- एमआयएम युतीची बातमी जेव्हा बघितली तेव्हा मला धक्का बसला. विदर्भात आम्ही या नगरपरिषद निवडणूक विजय आणि निर्णयाचे सर्व अधिकार स्थानी प्रभारी युसुफ पुंजानी आणि जिल्हाध्यक्ष यांना दिले होते. परंतु एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा करणे अपेक्षित होते. पुंजानी यांच्याकडून सर्व गोष्टींचा लिखित अहवाल मागवला आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिले की, शहर विकासासाठी अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षाला निमंत्रण होते. काँग्रेस आणि वंचित सोडून इतर सर्व पक्ष एकत्र आले. मात्र पक्षाच्या धोरणानुसार भाजपासोबत युतीची तडजोड अशक्य आहे. त्यामुळे अकोटमधून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांना आघाडीतून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. विकास होणे किंवा न होणे महत्त्वाचे नाही. परंतु ज्या पक्षाने देशात जात, धर्म या मुद्द्यांवर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्या पक्षासोबत तडजोड करून आम्ही सत्तेत बसणार नाही, असा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा आणि राष्ट्रीय नेते म्हणून ओवेसी यांचा स्पष्ट आदेश आहे. नगरसेवकांनी स्वत: निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर किंवा त्यांना वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांना आघाडी करण्यासाठी सूचना दिल्या असल्यास त्यांना जाब विचारला जाणार आहे. ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अकोट आणि अंबरनाथ येथील युतीवरून खा. संजय राऊत यांनी अत्यंत जहाल शब्दांत भाजपावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भाजपा कामाठीपुर्यातील वारांगनेसारखी झाली आहे. पेजेला देईल, त्याच्या शेजेला जाईल,अशी भाजपाची अवस्था आहे. काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली म्हणून उध्दव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणारी भाजपा दुतोंडी गांडूळ आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसशी चुंबाचुंबी करताना भाजपाला कसलीही लाज वाटली नाही. आम्ही कधीही एमआयएमच्या वाटेला गेलो नाही आणि एमआयएम कधी आमच्याजवळ आली नाही. मात्र स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार समजणार्या भाजपाने थेट ओवेसींशी निर्लज्ज युती केली. तेव्हा यांचे रक्त हिरवे झाले नाही. ज्या पक्षावर मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा आरोप सातत्याने केले, त्याच काँग्रेसबरोबर अंबरनाथमध्ये भाजपाने शय्यासोबत केली. भाजपा आता कामाठीपुर्यातील वारांगना झाली आहे.दरम्यान फडणवीस यांच्या नाराजीनंतर अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपाने कारणे दाखव नोटीस पाठवली आहे.
अंबरनाथमध्ये काँग्रेस ब्लॉक
अध्यक्ष प्रदीप पाटील निलंबित
अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसने पक्षाची अधिकृत भूमिका डावलून भाजपासोबत राजकीय समन्वय साधल्याचा ठपका ठेवत ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण ब्लॉक कार्यकारिणी बरखास्त करून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांवरही निलंबनाची कारवाई केली आहे. हे नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अंबरनाथमध्ये 12 नगरसेवकांसह काँग्रेस तिसरा मोठा पक्ष ठरला होता. तर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्यासह भाजपाचे 14 नगरसेवक विजयी झाले होते. 27 नगरसेवक असलेला शिंदे गट अंबरनाथमधील सर्वात मोठा पक्ष होता. निकालानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युतीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र भाजपाने त्यांना बाजूला ठेवत काँग्रेससोबत युती करून सत्ता स्थापन केली. नगराध्यक्ष भाजपाच्या तेजश्री करंजुळे शपथ घेतानाच्या समारंभात मित्रपक्ष म्हणून काँग्रेसचे 12 नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक यांना पहिल्या रांगेत मानाचे स्थान दिले होते.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
रिकाम्या रस्त्यांवर गुलाबी कार; अजित पवारांना पुणे शहराचा सुन्न प्रतिसाद
पुण्याला स्मार्ट शहर बनविण्याचे भाजपाचे वचन; संकल्पपत्रात भाजपच्या मोठ्या घोषणा









