मुंबई – कॉंग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असताना आता आयोगाने देशातील तब्बल ३३४ राजकीय पक्षांचे अस्तित्व उखडून टाकले आहे. या पक्षांची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अवामी विकास पार्टी(Awami Vikas Party) , बहुजन रयत पार्टी (Bahujan Rayat Party), भारतीय संग्राम परिषद (Bharatiya Sangram Parishad) , इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया (Indian Union Party of India),नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी (Nav Bharat Democratic Party), नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी (Nav Bahujan Samajparivartan Party), पीपल्स गार्डियन (People’s Guardian) ,द लोक पार्टी ऑफ इंडिया (The Lok Party of India) आणि युवा शक्ती (Yuva Shakti) संघटना या पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम- २९ बी आणि कलम- २९ सी नुसार कोणत्याही राजकीय पक्षाने नोंदणी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत किमान एकदा निवडणूक लढवणे आवश्यक आहे. जर पक्षाने सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकांत भाग घेतला नाही, तर त्याला आयोगाच्या यादीतून वगळले जाऊ शकते.
नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना आता लोकप्रतिनिधी कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कोणतेही निवडणूक लाभ मिळणार नाहीत.यात निवडणूक चिन्हांचा वापर,आयकर सवलत, प्रचारासाठी मिळणाऱ्या विशेष सुविधा यांचा समावेश आहे.आयोगाने असेही स्पष्ट केले आहे की,या निर्णयाने प्रभावित कोणताही पक्ष ३० दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सक्रिय राजकीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आणि ६७ प्रादेशिक पक्ष सक्रिय आहेत.