Devendra Fadnavis on Operation Sindoor | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरभारतीय हवाई दलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारचंकौतुक केलं आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत हा ‘नवा भारत’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, या कारवाईनंतर युद्ध हा पर्याय नसल्याची प्रतिक्रिया देणारे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या (POK) हद्दीतील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानकडून ज्या प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न होत होता आणि पहलगाममध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आलं, त्यातून संपूर्ण भारतात संताप होता. मात्र, आज संपूर्ण भारतीयांना समाधान वाटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो.”
पंतप्रधानांनी या घटनेचं प्रत्युत्तर देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि भारतीय लष्कराने ते अतिशय प्रभावीपणे पूर्ण केलं आहे. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत. दहशतवादाविरुद्धची लढाई भारताने खंबीरपणे केली आहे. हा नवा भारत आहे आणि तो अशा हल्ल्यांना सहन करणार नाही, हे भारताने दाखवून दिले आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
भारताने जगातील अनेक देशांशी संपर्क साधून पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी विविध देशांशी चर्चा करून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. त्यामुळेच आज संपूर्ण जग भारताबरोबर आहे. पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्व दहशतवादी तळ नष्ट करण्याचं काम भारतीय लष्कराने केलं आहे, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
राज ठाकरेंचच्या टीकेला प्रत्युत्तर:
पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले होते की, दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. अमेरिकेने ट्विन टॉवर हल्ल्यानंतर युद्ध न करता दहशतवाद्यांना ठार मारले. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला आणखी काय बरबाद करणार? हल्लेखोर दहशतवादी अजून सापडलेले नाहीत आणि पर्यटन स्थळावर सुरक्षा का नव्हती, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. एअर स्ट्राईक करून लोकांचं लक्ष भरकटवणं योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करत आहे आणि भारताच्या पाठिशी उभं आहे.”
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे संपूर्ण शूटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे आता कुणालाही पुरावा मागण्याची गरज उरलेली नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाही टोला लगावला.