Flag Hoisting Raigad : रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासंदर्भात मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक काढून गोगावले यांचे नाव निश्चित केले आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सुरू असलेली राजकीय रस्सीखेच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मागील वर्षी १८ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यावेळी रायगड जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे, तर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या निर्णयामुळे शिंदे गटात तीव्र नाराजी पसरली होती. विशेषतः रायगडमध्ये भरत गोगावले यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी त्याच रात्री रस्त्यावर उतरून मुंबई–गोवा महामार्ग रोखून धरला होता.
गतवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. त्या वेळी मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र वरिष्ठांचा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात वादाचे सूर कायम असतानाच, काल भरत गोगावले यांनी जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, ही जनतेची अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली होती. वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागतो, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली होती.
त्यानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढत अलिबाग येथील प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणासाठी भरत गोगावले यांचे नाव निश्चित केले. जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी मिळणे हे गोगावले यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून, या निर्णयाकडे रायगडच्या राजकारणात विशेष लक्ष दिले जात आहे.









