Suresh Kalmadi Passes Away: पुण्याच्या राजकारणावर अनेक दशके आपला प्रभाव पाडणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते दीर्घकालीन आजाराने त्रस्त होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे 3:30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पुणे शहरासह देशाच्या राजकीय आणि क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पायलट ते राजकारणातील ‘सर्वेसर्वा’
सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 1964 ते 1972 या काळात भारतीय हवाई दलात वैमानिक (पायलट) म्हणून देशसेवा केली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुण्यात सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1982 ते 1996 या प्रदीर्घ काळासाठी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले, तर 1996 आणि 2004 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. काँग्रेसप्रणीत सरकारमध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि राष्ट्रकुलचा वाद
सुरेश कलमाडी यांची खरी ओळख केवळ राजकारणीच नाही, तर एक सक्षम क्रीडा प्रशासक म्हणूनही होती. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (IOA) अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या पुढाकारानेच 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम्स) पार पडल्या. मात्र, याच स्पर्धेतील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली. 2011 मध्ये त्यांना अटकही झाली होती, परंतु 15 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करत त्यांना ‘क्लीन चिट’ दिली होती.
पुण्याला दिली जागतिक ओळख
पुणे शहराला सांस्कृतिक आणि क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यात कलमाडींचा मोठा वाटा होता. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पुण्याची ख्याती जगभर पोहोचवली. पुण्यातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
सुरेश कलमाडी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत एरंडवणे येथील ‘कलमाडी हाऊस’ या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.









