Gauri Garje- भाजपा मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सचिव अनंत गर्जे काल रात्री पोलिसांना शरण गेल्यावर त्याला अटक करण्यात आली. त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज सकाळी मयत डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या (Gauri Garje) पार्थिवावर अहिल्यानगरमधील मोहोज देवढे येथे अत्यंत शोकाकूल व तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हे अनंत गर्जेचेही गाव असून, त्याच्या बंगल्यासमोरच अंत्यसंस्कार करणार, त्याला बोलावून आणा नाहीतर त्याला व्हिडिओ कॉलवर आणा, असा आग्रह गौरीच्या नातेवाईकांनी धरला. त्यावरून पालवे आणि गर्जे कुटुंबात बाचाबाची झाली, तणाव वाढला. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या तणावाच्या वातावरणातच गर्जेच्या बंगल्याजवळ अंत्यसंस्कार झाले. यावेळी गौरीचे वडील दुःखाने विव्हळत म्हणत होते की, श्रीमंताला तुमची मुलगी देऊ नका, त्या भपकेबाजीवर जाऊ नका, गरिबाघरीच मुलगी द्या.
आज सकाळीच डॉ. गौरी यांचे पार्थिव पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे या अनंत गर्जे याच्या गावात आणण्यात आले. अनंतच्या घरासमोरच गौरीचे सरण रचले. याला गर्जेच्या कुटुंबियांनी विरोध केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घराच्या दारात अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचण्यात आले. तिथे पोलीस बंदोबस्तातच डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी गौरीच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. उपस्थित पोलिसांना उद्देशून तिच्या वडिलांनी ‘तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या, अशी आर्त विनवणी केली. मन हेलावून टाकणारे हे दृश्य होते. शनिवारी रात्री गौरी यांचा मृतदेह वरळी येथील त्यांच्या राहत्या घरी आढळला. आई-वडिलांनी घातपाताचा आणि छळाचा संशय व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीवरून पतीसह दीर व नणंद या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतरच पती अनंत गर्जे याने काल मध्यरात्री मुंबईतील वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी गर्जेचा जबाब नोंदवून घेतला. प्राथमिक तपासात, आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. यानंतर अनंत हा पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला. रस्त्यात त्याने गौरीला वारंवार फोन लावला. मात्र गौरीने तो उचलला नाही. त्यामुळे अनंत माघारी आले. आवाज देऊनही दार उघडत नसल्याने अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला. यावेळी गौरीने गळफास घेतल्याचे दिसले. आता याच अनुषंगाने मुंबई पोलीस तपास करत आहेत.
सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि तज्ज्ञ डॉक्टर राजेश ढेरे यांच्या नेतृत्त्वाखाली फॉरेन्सिक पथकाने व डॉक्टर पथकाने आज गर्जे राहत असलेल्या वरळी येथील घराची कसून तपासणी केली. डॉ. ढेरे यांनी सांगितले की, आत्महत्येची किती शक्यता आहे हे तपासले. गौरी यांचा मृतदेह ज्या पंख्याला लटकलेला होता त्या पंख्याची उंची तपासली. हा पंखा किती वजन घेऊ शकते, हेही तपासले. आवश्यक नमुने गोळा केले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. गौरीचा मृत्यू अनैसर्गिक असून मृत्यूचे प्राथमिक कारण ‘लिगेचर कम्प्लेशन ऑफ नेक’ (गळ्याला फास बसून) असे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कालपासूनच या प्रकरणावरून भाजपा मंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले आहे. आजही पत्रकार परिषद घेऊन दमानियांनी आरोपांची राळ उडवून दिली. त्यांनी आरोप केला की, तुमच्याच आडनावाचे हे कुटुंब होते, मग पंकजाताई तुम्ही त्यांच्या मदतीला का गेला नाहीत? अंत्यविधीला का गेला नाहीत? पीए तुमच्यासाठी मुलासारखा होता ना, त्याच्या लग्नालाही तुम्ही गेला होता. मग गौरीच्या अंत्यविधीला का गेला नाहीत? जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही मदतीला धावून जाणे गरजेचे होते. पण पुन्हा एकदा ती जबाबदारी पार पाडताना तुम्ही दिसल्या नाहीत. दरम्यान, दमानिया या प्रकरणात पंकजा मुंडे यांना विनाकारण दोष देत असल्याची टीका होत आहे.
हे देखील वाचा –
२० लाख रुपये देऊन चार उमेदवार फोडले! युगेंद्र पवारांचा बारामतीत गंभीर आरोप









