Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या मालकीच्या वाहनामुळे झालेल्या अपघाताच्या प्रकरणाची सध्या चर्चा दिली. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव कारने एका रिक्षाला धडक दिली, ज्यात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी योग्य तपास होत नसल्याचा आरोप करत थेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली.
मंत्री पाटील यांची थेट पोलिस उपायुक्तांना सूचना
जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी भेट घेतल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट पोलिस उपायुक्त (DCP) संभाजी कदम यांना फोन करून अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पाटील यांनी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, तरीही वाहनमालक म्हणून तिच्यावर कायदेशीर कारवाई का होत नाही, अशी विचारणा केली. गौतमी पाटीलला उचलायचं की नाही…गाडी ज्याची आहे त्यांच्यावर कारवाई करायची नाही का. तसेच, जो कोणी कार चालवत होता त्याला तात्काळ अटक करा, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली. तसेच, अपघातग्रस्त कार जप्त करण्याची सूचना दिली. यावर चालकाला अटक केल्याची माहिती डीसीपींनी दिली.
नोटीस आणि उपचारांच्या खर्चावर भर
चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना अपघातग्रस्त वाहनाच्या मालकीणीला (गौतमी पाटील) नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, जखमी रिक्षाचालकाच्या उपचाराचा सर्व खर्च गौतमी पाटील हिच्या टीमकडून किंवा तिच्याकडून करण्यात यावा, अशी सक्त मागणीही त्यांनी केली.
हा अपघात मंगळवारी पहाटे 5 वाजता वडगाव पुलाजवळ घडला होता. सुरुवातीला पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला होता. आता मंत्री पाटील यांनी लक्ष घातल्यामुळे गौतमी पाटीलच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची आणि तिच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा– AYUSH Ministry: महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय! केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची मोठी घोषणा