Ajit Pawar :पुणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने गुन्हेगार उमेदवारांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर चहुबाजूने टीका झाली. त्यांची मोठी बदनामी झाली. या वादानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) मित्रपक्ष असलेल्या सचिन खरात यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे बोट दाखवून त्यांच्या कोट्यातून हे उमेदवार दिल्याचे सांगत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला हे लक्षात आल्यावर अजित पवार यांनी खरात यांच्यावर दबाव टाकून त्यांना युतीतून बाहेर पडायला लावले. त्यांचे गुन्हेगार उमेदवार मात्र कायम आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी आणि सून सोनाली, कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दिली आहे. गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकर या दोघांच्या टोळ्यांचे कारनामे राज्यभर ठाऊक असूनही राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली. याशिवाय सज्जू मलिक हाही राष्ट्रवादीचा पुण्यातील उमेदवार होता. हे सगळे सध्या तुरुंगात असून, निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तुरुंग प्रशासनाकडून विशेष परवानगी घेतली आहे. विशेष म्हणजे, हे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीचा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपासह उबाठा-काँग्रेसने अजित पवार यांच्यावर कठोर टीका करत ते राजकारणाचे गुन्हेगारीकरण करत असल्याचा आरोप केला होता. यावरून अजित पवार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात जाहीर वादही झाला होता. अजित पवारांनी मोहोळांचे नाव घेऊन गुंड घायवळला परदेशी कोणी पाठवले? असा आरोप केला होता. त्यावर मोहोळ यांनी आरोप सिद्ध करा, राजकारणातून निवृत्त होईल, असे प्रतिआव्हान त्यांना दिले होते.
या टीकेनंतर अजित पवार यांनी सारवासारव करत म्हटले होते की, आम्ही कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. सचिन खरात यांच्या पक्षाशी आमची युती असल्याने त्यांच्या कोट्यातील जागांवर त्यांनी हे उमेदवार दिले आहेत. आपल्या कोट्यातील जागांवर उमेदवार देण्याचा त्यांना अधिकार आहे.
आता सचिन खरात यांनीच निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पुणे महापालिका निवडणुकीतून माघार घेताना सचिन खरात यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन खरात म्हणाले की, मी सन्मानपूर्वक जागा मिळतील या अपेक्षेने अजित पवार यांच्यासोबत गेलो होतो. त्यांना तसे पत्रही दिले होते. त्यात सन्मानपूर्वक जागा देण्याची स्पष्ट मागणी केली होती. मात्र, आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी आणि माझा पक्ष या निवडणूक प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडत आहोत. कोणत्याही प्रभागात आमच्या पक्षाचा कोणत्याही इतर उमेदवाराला पाठिंबा नसेल. माझा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो. त्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतेही चुकीचे काम करणार नाही. राजकारणात दोन पावले मागे यावे लागले तरी चालेल, पण तत्त्वांशी तडजोड करणार नाही.
आता सचिन खरात यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे, राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची जबाबदारी आता थेट अजित पवारांवर आली आहे. मात्र, खरात यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे यावरून जोरदार चर्चा चालू आहे.
हे देखील वाचा –
निवडणूक तोंडावर पेडणेकर अडचणीत? प्रतिज्ञापत्रातील माहिती लपवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप









