गोव्याच्या बांधकाम खात्याचा मुंबईतील कंपनीवर बहिष्कार

Goa

पणजी – गोव्याच्या कला अकादमीतील नाट्यगृहाचे नूतनीकरण केलेल्या मुंबईतील  ‘टॅकटॉन’ या कंत्राटदार कंपनीकडून यापुढे कोणतेही काम करून घेतले जाणार नाही. तसेच पूर्वीच्या कंत्राटानुसार या कंपनीने ज्या कामांच्या शिफारशी सल्लागारांनी आता केलेल्या आहेत, त्यासाठी खर्च केलेले पैसे कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे.

याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता वल्लभ पै यांनी सांगितले की, टॅकटॉन या कंपनीने पूर्वीच्या कंत्राटानुसार नाट्यगृहात जी कामे केलेली आहेत, त्यातील अनेक कामांत त्रुटी दाखवून ती कामे नव्याने करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याने नियुक्त केलेल्या तिन्ही सल्लागारांनी आपापल्या अहवालातून केली आहे.

पूर्वी कंत्राटानुसार ही कामे त्याच सल्लागाराकडून मोफत करून घेण्याचा निर्णय झालेला होता. परंतु, सरकारचा ‘टॅकटॉन’ वर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या कामासाठी जेवढे पैसे खर्च झाले होते ते वसूल करून आणि या कंपनीला काळ्या यादीत टाकून ही कामे नव्या कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय झाला.