Gopichand Padalkar : नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आणि सक्तीच्या धर्मांतराचे अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली असून, केवळ नाशिकच नव्हे तर पुणे आणि इतर मोठ्या शहरांतील आयटी कंपन्यांमध्येही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत का, याचा सखोल शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकच्या एका नामांकित कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले. या पीडित महिलांचे लैंगिक शोषण करणे, आर्थिक छळ करणे आणि त्यांना बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडणे असे घृणास्पद प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. एका धाडसी महिलेने तक्रार केल्यानंतर हे रॅकेट समोर आले असून, आतापर्यंत दहा पीडित महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली आहे.
गोपीचंद पडळकर यांचे खळबळजनक विधान-
या प्रकरणावर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी लोकसंख्येच्या समतोलाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “ज्या गतीने अशा घटना घडत आहेत, त्या पाहता २०९० पर्यंत हिंदू समाज या देशात अल्पसंख्याक होईल. २०२७ च्या जनगणनेनंतर भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक असेल, अशी भीती वाटते.” काश्मीरमध्ये १०० वर्षांपूर्वी जी स्थिती होती, तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, ज्यांना ‘भारत माता की जय’ म्हणायचे नाही किंवा जे पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडतात, अशा प्रवृत्तींविरुद्ध हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय नेत्यांना आवाहन आणि कंपन्यांची पडताळणी-
पडळकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील हिंदू नेत्यांना उद्देशून म्हटले की, त्यांनी या प्रकरणाकडे केवळ राजकारण म्हणून न पाहता गांभीर्याने पाहावे. आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या संशयास्पद व्यक्तींच्या पदव्या (Degrees) खऱ्या आहेत का? तिथे ‘जिहादी’ विचारसरणीचे लोक सक्रिय आहेत का? याची तपासणी करणे आवश्यक आहे. कंपनीतील मानवी संसाधन (HR) विभागातील महिला अधिकाऱ्याने या छळाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले का, याचीही चौकशी व्हायला हवी. पालकांनीही आपल्या मुलींच्या प्रवासावर आणि त्यांच्या मित्रमंडळींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
रूपाली चाकणकर यांच्यावरील तक्रारीवर प्रतिक्रिया-
बीडमधील एका व्यक्तीने ‘एसआयटी’कडे तक्रार करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. यावर विचारले असता, पडळकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “अशी काही तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत मला सविस्तर माहिती नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील आणि सत्य काय ते बाहेर येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.











