Home / महाराष्ट्र / Gudi Padwa 2026 : नऊवारीचा थाट, भगव्या फेट्याचा दरारा आणि मराठी साज; गिरगावच्या शोभायात्रेत अवतरला शिवशाहीचा अनोखा काळ!

Gudi Padwa 2026 : नऊवारीचा थाट, भगव्या फेट्याचा दरारा आणि मराठी साज; गिरगावच्या शोभायात्रेत अवतरला शिवशाहीचा अनोखा काळ!

Gudi Padwa 2026 : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईची सांस्कृतिक पंढरी मानल्या जाणाऱ्या गिरगावमध्ये उत्सवाचा महापूर...

By: Team Navakal
Gudi Padwa 2026 
Social + WhatsApp CTA

Gudi Padwa 2026 : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईची सांस्कृतिक पंढरी मानल्या जाणाऱ्या गिरगावमध्ये उत्सवाचा महापूर लोटला होता. ढोल-ताशांच्या गगनभेदी गजरात, पारंपरिक वेशभूषेतील अबालवृद्धांच्या उत्साहात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात गिरगावच्या रस्त्यांवर जणू शिवशाहीचा काळ अवतरला होता. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेने मुंबईकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

रणरागिणींचा स्वॅग आणि मर्दानी खेळांची प्रचिती-
या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण ठरल्या त्या गिरगावच्या रणरागिणी. नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि डोक्यावर मानाचा भगवा फेटा परिधान करून बुलेटवर स्वार झालेल्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केवळ वेशभूषाच नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा वारसा जपत या महिलांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.

एका हातात काठी आणि दुसऱ्या हाताने ढोल वाजवण्याचे कौशल्य दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास गिरगावकरांचा अभूतपूर्व उत्साह अधोरेखित करत होता.

चित्तथरारक मल्लखांब आणि सांस्कृतिक रूपे-
शोभायात्रेमध्ये केवळ तरुणच नव्हे, तर चिमुकल्यांनीही आपल्या कौशल्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. एका लहान खेळाडूने उंच मल्लखांबावर सादर केलेल्या चित्तथरारक कसरती पाहून उपस्थित जनसमुदायाच्या नजरा खिळल्या होत्या. याच मिरवणुकीत हातामध्ये भव्य त्रिशूळ घेऊन साक्षात देवीचे रूप साकारलेली एक महिला आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. तिचे हे तेजस्वी रूप पाहून अनेक भाविकांनी नतमस्तक होऊन नमन केले.

वारकरी संप्रदायाचा वारसा आणि भव्य रथ-
सांस्कृतिक समृद्धीसोबतच आध्यात्मिक वारसाही या यात्रेत जपण्यात आला होता. विठ्ठल-रखुमाईच्या अतिशय सुंदर मूर्तींनी सजवलेला आणि वारकरी संप्रदायाचा जयघोष करणारा भव्य रथ या मिरवणुकीचे श्रद्धास्थान ठरला. टाळ-मृदंगाच्या तालावर विठूनामाचा गजर करत वारकरी या रथासोबत चालत होते. गिरगावच्या अरुंद गल्ल्यांमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत काढलेल्या भव्य आणि रेखीव रांगोळ्यांनी संपूर्ण परिसराची शोभा कैक पटींनी वाढवली होती.

परंपरेची जोपासना आणि नववर्षाचा संकल्प-
गिरगावच्या या शोभायात्रेने केवळ नववर्षाचे स्वागतच केले नाही, तर आपली मराठी संस्कृती आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले. परदेशी संस्कृतीच्या प्रभावातही आपली नाळ मातीशी आणि परंपरेशी घट्ट जोडलेली आहे, याचे दर्शन या निमित्ताने घडले. गिरगावकरांच्या या जंगी सोहळ्याने संपूर्ण मुंबईत चैतन्याचे वातावरण निर्माण केले असून, सोशल मीडियावरही या शोभायात्रेच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या