Hanumant Pawar Crime : पुणे शहरात राजकीय वादातून मारहाणीची एक खळबळजनक घटना समोर आली असून, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना काल, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पर्वती भागातील मित्रमंडळ चौकात घडली. हिंदुत्ववादी विचारवंत आणि कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही मारहाण केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत पवार हे मित्रमंडळ चौकाजवळ असताना तुषार दामगुडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. हनुमंत पवार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, मारहाण सुरू असतानाच दामगुडे यांनी आपल्याकडील पिस्तुल बाहेर काढले आणि त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. दिवसाढवळ्या भरचौकात शस्त्राचा धाक दाखवून झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी हनुमंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तुषार दामगुडे यांच्यासह अन्य दोन साथीदारांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून दामगुडे यांच्याकडील परवानाधारक पिस्तुल जप्त केले असून या घटनेत शस्त्राचा नेमका कसा वापर झाला, याची चौकशी सुरू केली आहे. गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना कायद्यानुसार नोटीस बजावली असून प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नाही.
पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आपली सविस्तर भूमिका मांडताना राज्य सरकार आणि गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला निपक्षपाती न्यायाची मोठी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या विचारसरणीला आणि संस्कारांना अधिक प्राधान्य दिल्याने, त्यांच्याकडून गृहमंत्री म्हणून अपेक्षित असलेले कर्तव्य पार पडले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका प्रवक्त्यावर झालेल्या शस्त्रांकित हल्ल्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासकीय कारवाईवर बोट ठेवताना हनुमंत पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “ज्या व्यक्तीने भररस्त्यात पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली, त्याला पोलिसांनी केवळ नोटीस बजावून सोडून देणे ही अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना तात्काळ कोठडी मिळणे अपेक्षित असताना, त्यांना मिळालेली ही सवलत कायद्याचा धाक कमी करणारी आहे.” आमचा जीव गेल्यानंतर किंवा आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच पोलीस प्रशासन कठोर पावले उचलणार का, असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी विचारला.
हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा मुद्दा उपस्थित करताना पवार यांनी परवानाधारक शस्त्रांच्या दुरुपयोगाकडे लक्ष वेधले. तुषार दामगुडे यांना देण्यात आलेले पिस्तुल हे स्वसंरक्षणासाठी आहे की इतरांना धाक दाखवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी, याची सखोल चौकशी गृहविभागाने करावी, अशी मागणी त्यांनी केली. परवानाधारक शस्त्राचा सार्वजनिक ठिकाणी दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीचा परवाना तात्काळ रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
नेमक घडल काय?
पुण्यातील मित्रमंडळ चौक परिसरात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात झालेल्या संघर्षाचा घटनाक्रम आता सविस्तरपणे समोर आला आहे.
१. हे दोन्ही लोकप्रतिनिधी एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आले होते.
२. वाहिनीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तुषार दामगुडे प्रथम इमारतीबाहेर पडले. त्यांच्या मागोमाग हनुमंत पवार हे भ्रमणध्वनीवर बोलत असताना संकुलाच्या बाहेर आले.
३. यावेळी इमारतीच्या बाहेरील पदपथावर आधीच थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांना आवाज देऊन जवळ बोलावले, ज्यातून वादाची ठिणगी पडली.
४. सुरुवातीला केवळ शाब्दिक चकमक असलेल्या या वादाचे स्वरूप काही क्षणांतच हिंसक झाले. तुषार दामगुडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी हनुमंत पवार यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
५. भररस्त्यात अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे पवार गोंधळून गेले आणि स्वसंरक्षणार्थ त्यांनी जवळच असलेल्या कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकांकडे धाव घेतली.
६. यावेळी दामगुडे आपल्याकडील पिस्तुल रोखून धमकावत असल्याचे पवार मोठ्या आवाजात ओरडून सांगत होते, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
७. मात्र, परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून आणि लोक जमा होण्यापूर्वीच तुषार दामगुडे आपल्या सहकाऱ्यासह दुचाकीवरून घटनास्थळावरून तातडीने पसार झाले.
८. या झटापटीमुळे मित्रमंडळ चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हनुमंत पवार यांनी या घटनेनंतर तात्काळ पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली.
पुण्यातील मित्रमंडळ चौक परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी या घटनेमागील नियोजित कारस्थानाचा गंभीर आरोप केला आहे. पवार यांच्या दाव्यानुसार, तुषार दामगुडे यांनी हा हल्ला उत्स्फूर्तपणे न करता, त्याकरिता आधीच आपल्या कार्यकर्त्यांना मित्रमंडळ चौकाजवळ पाचारण केले होते. “मी वृत्तवाहिनीच्या कार्यालयातून बाहेर पडताच, पूर्वनियोजित कटानुसार त्यांनी मला अडवले आणि थेट पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. केवळ मलाच नव्हे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दलही त्यांनी अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरत अपशब्द उच्चारले आणि शिवीगाळ केली,” असे पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
या जीवघेण्या हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी ॲड. अभय छाजेड आणि प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. काँग्रेस प्रवक्त्यावर शस्त्राचा धाक दाखवून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य आणि राजकीय संवेदनशीलता ओळखून पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारीही तात्काळ सक्रिय झाले.
घटनेची दखल घेत पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांनी तातडीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठले. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात लक्ष घातले असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. भरवस्तीत राजकीय प्रवक्त्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावली आहेत.
हे देखील वाचा – Raj Thackeray : जपानी मुलीचा तो व्हिडिओ व्हायरल! राज ठाकरेंनी व्हिडिओ शेअर करत थेट मोहन भागवंतांवर साधला निशाणा..













