Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धुळे येथे आयोजित काँग्रेसच्या एका मोठ्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला.
फडणवीस यांनी लोकशाही आणि संस्कृतीला फाशी देण्याचे काम केल्याचा आरोप करत सपकाळ यांनी त्यांना ‘जल्लाद’ आणि दिलेला शब्द विसरल्यामुळे ‘गजनी’ अशी उपमा दिली.
“मोदींपेक्षा फडणवीस जास्त फेकाफेकी करतात”
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात भाजपच्या घोषणांचा समाचार घेतला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन सरकारने पाळले नसल्याचे त्यांनी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात,” असा टोला त्यांनी लगावला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही किंवा अजित पवारांना ‘चक्की पिसिंग’ करायला लावू, अशा त्यांच्या जुन्या विधानांचा विसर पडल्याची टीकाही त्यांनी केली.
स्वातंत्र्याचा वारसा आणि भाजपवर निशाणा
काँग्रेसचा इतिहास बलिदानाचा असून भाजपने नेहमीच तोडफोडीचे राजकारण केल्याचा दावा सपकाळ यांनी केला. ते म्हणाले की, “स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसने लाखो लोकांचा त्याग पाहिला आहे, तर भाजपचे पूर्वज त्यावेळी ब्रिटिशांच्या सोबत होते. ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यात काहीही योगदान नाही, ते आज सत्तेत बसून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत.” लोकसभा आणि नगरपालिका निवडणुकीतील यशाचा दाखला देत त्यांनी धुळे महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता देण्याचे आवाहन जनतेला केले.
धुळ्यात काँग्रेसला बळ; अनेक दिग्गज पक्षांतरीत
हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत धुळ्यातील विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने समाजवादी पार्टीचे सलग 3 वेळा निवडून आलेले नगरसेवक अमीन पटेल यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती धरला.
या व्यतिरिक्त परवेझ शेख, अजहर पठाण, एमआयएमचे गनी डॉलर, जुनेद पठाण, शिवसेनेचे प्रेम सोनार आणि भाजपचे मुर्तुजा अन्सारी यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि इतर वरिष्ठ काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोठ्या पक्षांतरामुळे आगामी महापालिका निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा – Rohit Pawar : ‘थोरातसाहेब, हे बघा फोटो’; रोहित पवारांचा काँग्रेसवर पुन्हा हल्ला, जामखेड पराभवावरून महाविकास आघाडीत जुंपली









