Harshwardhan Sapkal : राज्याच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आता अशातच नवी मुंबईविमानतळाला भूमिपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे शिवाय भाजपा विकासाचा गेमचेंजर नाही तर काँग्रेसच्या योजनांना केवळ नवे लेबल लावणारा नेमचेंजर असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केली.
भाजपा महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत असल्याचे ते म्हणाले. परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा थेट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे सांगतात की, नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या. त्यावेळी भूमिपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दीर्घ लढा दिला होता. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच उदयास आली होती. दि. बा. पाटील यांची आमदार आणि खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द सगळ्यांच्याच लक्षात राहणारी राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसीत होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही तसेच दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून जनभावनेचा आदर केला पाहिजे, असे देखील सपकाळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा डाव सर्वांना माहित आहे. ‘फडणविसांचा कावा ना कळे ब्रम्हदेवा’, असा आहे, अशी घणाघाती टीका देखील सपकाळ यांनी केली. नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा करण्यात येत आहे. त्यामुळे विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावला आहे. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल, असा धृढ विश्वास यावेळी सपकाळ यांनी व्यक्त केला.









