Heavy Rain : आज काल पाऊस म्हटलं कि धडकीच भरते. कारण मागचे ३-४ महिने पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही आहे. अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र घाम फोडला आहे. ऐन कापणीच्या वेळी आलेल्या या पावसाने भात आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५४,८८३ हेक्टरवर एवढी भाताची लागवड करण्यात आली होती. सध्या भात आणि नाचणी पिकाची कापणी सुरू असतानाच पाऊस आला. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, ऑक्टोबर २०२५ मधील या पावसामुळे बाधित गावे १३६ असून बाधित शेतकरी १०१८ इतले आहेत. यामध्ये नुकसानीचे क्षेत्र १९६.०२ हेक्टर एवढे असणार आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्रामुख्याने भात आणि नाचणीच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग यांना सादर करण्यात आला आहे आणि तो आता पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

कापणी करून शेतात ठेवलेले भात पीक पूर्णपणे भिजले आहे, त्यामुळे ते जागेवरच कुजू लागले आहे. कापणी केलेले पीक मळणी यंत्राद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने मळले जाते, पण पावसामुळे मळणीच्या कामात व्यतय येत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, मदतीसाठी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे, त्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी. माहिती मिळाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी हे शेतीची प्रत्यक्ष पाहणी सुद्धा करतील.
जिल्हा कृषी अधिकारी आवाहन करतात कि जर अधिक माहितीसाठी ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी वेळेत माहिती दिल्यास नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होऊ शकते.
हे देखील वाचा – Montha Cyclone Maharashtra Weather : मोंथा चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका?









