Hiware Bazar Award: पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्शगाव हिवरे बाजारने पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात हिवरे बाजारला ‘जिल्हास्तर जलसमृद्ध गाव’चा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. गावाच्या जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाच्या प्रभावी मॉडेलमुळे हे यश मिळाले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यशाळेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे अध्यक्ष मा. ना. रामजी शिंदे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिवरेबाजार गावाला हा पुरस्कार पाण्याच्या ताळेबंदावर आधारित योग्य पिक पद्धतीचा अवलंब आणि गुणवत्तापूर्ण जलसंधारणाच्या कामामुळे मिळाला आहे.
या अभियानाचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, ग्रामीण विकासाला गती देणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा आहे.
या निमित्ताने पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये गावांचा सर्वसमावेशक विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते. पुरस्कार स्वीकारताना गावाच्या सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
हिवरेबाजारमध्ये केवळ जलव्यवस्थापनच नाही, तर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका बिनविरोध करून सामाजिक सलोखा जपला जातो. याच प्रयत्नांमुळे हे गाव सातत्याने विकासाचे आदर्श ठरत आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
व्हिएतनामच्या कंपनीची भारतात एन्ट्री, लाँच केल्या दोन दमदार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत