Housing Project In Selu : मुंबईच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सेलू येथे गिरणी कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या हजारो घरांच्या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाचे भूमीपूजन येत्या १ मे रोजी, अर्थात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल गिरणी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले.
महाराष्ट्र दिनी गिरणी कामगारांना मोठी भेट
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे भूमीपूजन होणे, हे कामगारांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकात्मक आणि आनंदाची बाब आहे. गिरणी कामगारांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या हक्काला दिलेली ही एक मोठी पावती मानली जात आहे.
गिरणी कामगारांच्या घरांसाठी सरकारचे निर्णायक पाऊल; आमदार पराग आळवणींच्या पुढाकाराला यश, १ मे रोजी होणार भूमिपूजन-
गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग आळवणी यांनी घेतलेल्या पुढाकाराला मोठे यश आले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या चालू कामकाजादरम्यान, आमदार आळवणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गिरणी कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. या भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करून,सेलू येथे उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे तातडीने भूमिपूजन करावे आणि घरांच्या किमती सर्वसामान्य कामगारांना परवडतील अशा पद्धतीने कमी कराव्यात, अशी आग्रही विनंती केली. या महत्त्वपूर्ण बैठकीवेळी गिरणी कामगार कृती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये नवाकाळ वृत्तपत्राच्या सर्वेसर्वा जयश्री खाडिलकर-पांडे, प्रवीण घाग, जयप्रकाश भिलारे आणि नंदू पारकर हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी १ मे रोजी भूमीपूजनाला येणार असल्याचे सांगितले.












