HSRP Number Plate Deadline: महाराष्ट्र परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. HSRP नंबर प्लेट (HSRP Number Plate Deadline) बसवण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर 15 ऑगस्टनंतर कठोर कारवाई केली जाणार असून, 1,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
याआधी मार्च, एप्रिल आणि जून 2025 अशा तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट केंद्रांवरील गर्दी आणि मर्यादित प्लेट्सची उपलब्धता यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्रात एकूण 2.1 कोटी वाहनांना HSRP प्लेट्सची गरज आहे, पण आतापर्यंत केवळ 23 लाख वाहनांवरच या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत.
HSRP प्लेट्सची गरज कोणाला?
1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना, म्हणजेच दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि खासगी वाहनांना HSRP बसवणे बंधनकारक आहे. 2019 नंतरच्या नवीन वाहनांना विक्रीवेळीच या प्लेट्स लावण्यात आल्या आहेत.
HSRP प्लेट्सचे फायदे
या प्लेट्समुळे वाहनांची सुरक्षित ओळख पटवणे सोपे होते, कारण त्यावर युनिक सीरियल नंबर, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि टॅम्पर-प्रूफ डिझाइन असते. या प्लेट्समुळे वाहन चोरी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांना आळा बसतो, कारण या प्लेट्स सहजपणे कॉपी करता येत नाहीत आणि त्यांच्यावरील कोड थेट आरटीओच्या डेटाबेसशी जोडलेला असतो.
नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
ऑनलाइन अर्ज: www.transport.maharashtra.gov.in किंवा www.bookmyhsrp.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- RTO निवडा: तुमच्या वाहनाच्या नोंदणीनुसार योग्य आरटीओ (RTO) निवडा.
- माहिती भरा: वाहनाचा नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरा.
- अपॉइंटमेंट: जवळच्या फिटमेंट सेंटरवर तारीख आणि वेळ निवडा.
- शुल्क भरा: दुचाकीसाठी 531 रुपये आणि चारचाकीसाठी 745 रुपये (जीएसटीसह) शुल्क भरावे लागेल. घरपोच नंबर प्लेटसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
- फिटमेंट: अपॉइंटमेंटच्या दिवशी वाहनासह फिटमेंट सेंटरवर जा.
ज्या वाहनधारकांनी 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल, परंतु त्यांची फिटमेंटची तारीख नंतरची असेल, त्यांना दंड आकारला जाणार नाही.